ऐन उन्हाळ्याच्या हंगामात वातानुकूलित यंत्राची श्रेणी विस्तारताना व्हिडीओकॉनने दुप्पट बाजारपेठ गाठण्याचे लक्ष्य निर्धारित करताना देशातील विक्री केंद्रेही दुपटीवर नेण्याचा संकल्प सोडला आहे.
कंपनीने मंगळवारी या श्रेणीतील दोन नव्या उपकरणांची भर घातली. क्वांटम एज तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या या यंत्राद्वारे उच्च दर्जाची सेवा बहाल करत असल्याचा दावा कंपनीने केला.
नव्या उत्पादनांच्या जोरावर २०१५ अखेपर्यंत वातानुकूलित यंत्र बाजारपेठेतील १२ टक्के हिस्सा काबीज करण्यात येईल, असा विश्वास या वेळी कंपनीच्या तंत्रज्ञान व नावीन्यता विभागाचे प्रमुख अक्षय धूत यांनी व्यक्त केला. देशातील कंपनीच्या उपकरणांची दालन विक्री संख्याही सध्याच्या ४,५०० वरून ९,५०० वर नेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
बीईईच्या तीन व पाच तारांकित दर्जाने सन्मानित चपटय़ा प्रकारातील या उपकरणाची किंमत ३७,९९० व ४५,४९० रुपये आहे. १.५ टन क्षमतेच्या चपटय़ा आकारात दोन रंग त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती या वेळी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र विभागाचे मुख्य परिचलन अधिकारी संजीव बक्षी यांनी दिली.
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे उत्पादन विक्री प्रकल्प असलेल्या व्हिडीओकॉनचा तामिळनाडूतील मदुराई येथे नवा प्रकल्प वर्षअखेर सुरू होईल, असेही या वेळी सांगण्यात आले. यामुळे कंपनीची सध्याची उपकरण निर्मिती क्षमता वार्षिक २.५ लाखांवरून ५ लाखांपेक्षा अधिक होईल, असेही नमूद करण्यात आले.व्हिडीओकॉनने यंदाच्या हंगामातच वाय-फायवर आधारित वातानुकूलित यंत्र सादर केले होते. कंपनीचे उपकरण प्रकार वर्षभरात ३६ वरून ६५ झाली आहे. सध्या या क्षेत्रात १६ टक्क्यांसह व्होल्टास आघाडीवर आहे. २०१५ अखेपर्यंत भारतीय वातानुकूलित यंत्रांची बाजारपेठ ४० लाख होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या चपटय़ा उपकरणांचा हिस्सा सर्वाधिक ८५ टक्क्यांपर्यंत आहे. वार्षिक १५ टक्के दराने ही बाजारपेठ वाढत आहे.

रतीश तागडे यांना आशिया-पॅसिफिक उद्योजकता पुरस्कार
मुंबई: आशिया पॅसिफिक क्षेत्रात नव्या उदयोन्मुख उद्यमशीलतेला २००७ सालापासून सन्मानित करून प्रोत्साहित करणाऱ्या आशिया पॅसिफिक उद्योजकता पुरस्कार यंदा भारतातून परफेक्ट ऑक्टेव्ह मीडिया प्रोजेक्ट्स लि.चे संस्थापक रतीश तागडे हे मानकरी ठरले. स्वत: प्रसिद्ध व्हायोलिनवादक असलेले तागडे यांनी भारतीय संगीत क्षेत्राला प्रोत्साहनाचे काम करीत त्यावर उभारलेल्या यशस्वी व्यवसायाची दखल घेत हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.