तात्काळ कर्ज न मिळाल्यामुळे बंद झालेल्या जेट एअरवेजमधील १०० वैमानिक आणि ४५० केब्रिन क्रू सदस्यांना विस्तारा एअरलाइन्सने आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. विस्तारा एअरलाइन्स टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेली विमान कंपनी आहे. जेटच्या काही विमानांचाही ताफ्यात समावेश करण्यावर विचार सुरु आहे.

टाटाची दुसरी कंपनी एअर एशियाची जेटच्या बोईंग ७३७ विमानांवर नजर आहे. एअर इंडिया, स्पाइस जेट आणि गो एअर या कंपन्यांनी सुद्धा जेटचे वैमानिक आणि केबिन क्रू ला आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. जेटमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. बुधवारपासून कर्मचाऱ्यांसाठी असलेली ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी रद्द होणार असल्याचे जेटकडून मंगळवारी कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले.

कर्ज उपलब्ध न झाल्यामुळे मेडिक्लेम पॉलिसीचे हप्ता भरण्यासाठी पैसे नाहीत असे कंपनीकडून सांगण्यात आले. या ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळायच्या. सरकार सध्या जेटचा स्लॉट दुसऱ्या कंपन्यांना देत आहे.