मोबाइल नेटवर्क कंपन्यांना मिळालेल्या ९०० मेगाहार्टझच्या स्पेक्ट्रमचा वापर करुन मुंबई वर्तुळात थ्रीजी सेवा अधिक जलद करण्याकडे कंपन्यांनी भर दिला आहे. एअरटेल पाठोपाठ आता व्होडाफोन ग्राहकांनाही वेगवान थ्रीजीचा अनुभव घेता येतो आहे. 

ओकला स्पीडटेस्टच्या अहवालानुसार फेब्रुवारी २०१४ ते २०१५ या कालावधीत व्होडाफोन ग्राहकांना व्हिडीओ डाऊनलोडिंगचा वेग २२ टक्क्यांनी वाढल्याचे नोंदविले आहे तर फोटो डाउनलोडिंगचा वेग ४३ टक्क्यांनी वाढल्याचे नोंदविले आहे. याचबरोबर संकेतस्थळाचे पान सुरू होण्यासाठीचा वेगही २३ टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई वर्तुळामध्ये ग्राहकांची संख्या वाढविणे हे कंपनीचे उद्दीष्टय़ असले तरी सध्या असलेल्या थ्रीजी ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याकडे जास्त कल असल्याचे व्होडाफोन इंडियाच्या मुंबई विभागाचे व्यवसाय प्रमुख इश्मीत सिंग यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरात कंपनीतर्फे १२००हून जास्त नवीन मोबाइल टॉवर्सचे जाळे पसरविण्यात आले आहेत. याचबरोबर ९०० मेगाहार्टझचे स्पेक्ट्रम वापरल्यामुळे थ्रीजी सेवेची क्षमता दुप्प्टीने वाढल्याचेही सिंग यांनी नमूद केले.
सध्या ग्राहक टूजी आणि थ्रीजीच्या सुविधांचा पुरेपूर वापर घेत नसताना फोजी सुरू करणे घाईचे ठरेल. कंपनी फोजी सुविधेबाबत विचार करत असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यावर ती सेवा सुरू करेल असेही सिंग यांनी नमूद केले.