नवी दिल्ली : दोन कंपन्यांच्या एकत्रीकरणाने ग्राहकसंख्येनुसार देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी बनलेल्या व्होडाफोन आयडियाने २५,००० कोटी रुपयांची हक्कभाग  विक्री प्रक्रिया राबविण्याचे निश्चित केले आहे.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या हक्कभाग विक्रीकरिता सहभाग घेऊ पाहणाऱ्या भागधारकांना व्होडाफोन आयडियाने विद्यमान बाजारभावात ६१ टक्के सवलत देऊ केली आहे. प्रति समभाग १२.५० रुपये दराने हे समभाग भागधारकांना खरीदता येणार आहेत. आयडियाचे समभाग मूल्य बुधवारअखेर मुंबई शेअर बाजारात ३३ रुपयांवर स्थिरावले होते.

कंपनीची ही प्रक्रिया १० ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहे. त्यानुसार विद्यमान भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक ३८ समभागांमागे ८७ समभाग खरेदी करता येतील. या माध्यमातून मिळणाऱ्या निधीतून कंपनीवरील कर्जाचा भार कमी करण्याचा प्रयत्नही असेल.

कंपनीवर सध्या १.२३ लाख कोटी रुपयांचा कर्जभार आहे. रिलायन्स जिओबरोबरची स्पर्धा आव्हानात्मक बनली असताना नव्या प्रक्रियेद्वारे व्होडाफोन आयडियाला तिचे ४जी तसेच ५जी जाळे अधिक विस्तारता येईल.

व्होडाफोन आयडियामध्ये ब्रिटिश कंपनी व्होडाफोनचा ४५.१ टक्के हिस्सा आहे, तर उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा व्यक्तिगत २६ टक्के व त्यांच्या आयडिया कंपनीचा हिस्सा २८.९ टक्के आहे. या माध्यमातून व्होडाफोनमध्ये बिर्ला समूहाचे वर्चस्व वाढणार आहे.