२,००० कोटींची गुंतवणूक; २५० रोजगारनिर्मिती

मुंबई : युरोपीयन वाहननिर्मिती समूह फोक्सवॅगनने महाराष्ट्रातील पुणे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र सुरू केले आहे. समूहातील चेक रिपब्लिकन स्कोडाच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या केंद्राकरिता २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून या माध्यमातून २५० अभियंत्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

फोक्सव्हॅगन-स्कोडाच्या चाकण येथील या प्रकल्पाचे उद्घाटन चेक रिपब्लिकचे पंतप्रधान आंद्रे बाविश यांच्या हस्ते शनिवारी झाले. स्कोडाच्या तांत्रिक विकास मंडळाचे सदस्य ख्रिश्चन स्ट्रुब, फोक्सवॅगन ग्रुप  इंडियाचे प्रमुख गुरप्रताप बोपराय आदी यावेळी उपस्थित होते.

फोक्सवॅगन समूहाच्या वतीने स्कोडा इंडिया २.० प्रकल्प घोषित करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समूहाचे चेक रिपब्लिकबाहेरील पहिले तंत्रज्ञान केंद्र पुण्यात सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या जोरावर कंपनी २०२० पर्यंत ५ टक्के बाजारहिस्सा मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच कंपनी २०२० च्या दिल्लीतील वाहन मेळ्यात या तंत्रज्ञान मंचाच्या माध्यमातून पहिली मध्यम गटातील एसयूव्ही सादर करेल, अशी घोषणाही करण्यात आली.

जुलै २०१८ मध्ये फोक्सवॅगनने २.० प्रकल्पात ७,९०० कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले. पुण्यातील तंत्रज्ञान केंद्र हा त्याचाच एक भाग आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीच्या वाहनांमध्ये ९५ टक्क्य़ांपर्यंत स्थानिक स्तरावरील सुटे भाग वापरले जातील.