१० टक्के हिस्सा खरेदीसाठी ६ अब्ज डॉलरच्या मोबदल्याची चर्चा; वदंतेने समभागाची १४ टक्क्य़ांनी झेप

गुंतवणूक गुरू वॉरन बफे यांनी भारतातील आघाडीची खासगी बँक कोटक महिंद्रमध्ये हिस्सा खरेदीसाठी रस दाखविल्याची चर्चा आहे. बँकेने मात्र भांडवली बाजाराला याबाबत त्यांना माहिती नसल्याचे म्हणत हात झटकले आहेत.

वॉरन बफे कोटक महिंद्रमधील मोठा हिस्सा ४ ते ६ अब्ज डॉलरमध्ये खरेदी करीत असल्याबाबत जोरदार चर्चा बाजारजगतात सुरू आहे. यामुळे बँकेचा समभागही शुक्रवारच्या व्यवहारात थेट १४ टक्क्यांपर्यंत झेपावला. बफे हे त्यांच्या बर्कशायर हॅथवेमार्फत भारतीय बँकेत गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याबाबतचा व्यवहार येत्या काही दिवसांतच प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.

बफे हे बँकेतील गुंतवणुकीमार्फत मुख्य प्रवर्तक उदय कोटक यांच्याकडील समभाग खरेदी करतील, अशी चर्चा आहे. यामुळे २०१८ पर्यंत प्रवर्तकाच्या बँकेतील २० टक्क्यांखाली प्रमाणाबाबतची अट पाळली जाण्याची शक्यता आहे. बँकांमधील प्रवर्तकांचा हिस्सा २०२० पर्यंत १५ टक्क्यांपर्यंत आणण्याचीही रिझव्‍‌र्ह बँकेची अट आहे.

कोटक महिंद्र बँकेने यापूर्वी २०१५ मध्ये आयएनजी वैश्य बँकेतील हिस्सा खरेदी केला होता. कोटक महिंद्र बँकेच्या व्यवसायाला २००२-०३ या वित्त वर्षांत सुरुवात झाली. अनिवासी भारतीय गुंतवणूकदार प्रेम वत्स यांच्या फेअरफॅक्स होल्डिंग्जने नुकताच केरळस्थित कॅथॉलिक सीरियन बँकेत ५१ टक्के हिस्सा खरेदी केला होता. अपवाद म्हणून या व्यवहाराला रिझव्‍‌र्ह बँकेची मान्यता होती. हीच बाब एचडीएफसी बँकेबाबतही होती.