सुधीर जोशी

इंधन तेलाचे वाढते दर तसेच रुपया-डॉलर विनिमय दरांत वाढ यामुळे आठवडय़ाची सुरुवात काहीशी नरमाईने झाली. बाजारातील निवडणूकपूर्व उत्साह कमी होऊन गुंतवणूकदारांनी या आठवडय़ात काहीशी सावधगिरी दाखविली. रोजच्या व्यवहारात अस्थिरता दाखवत सप्ताहअखेर मुंबई बाजाराच्या निर्देशांक- सेन्सेक्समध्ये ९५ आणि निफ्टीमध्ये २२ अंशांची घट झाली.

टाटा मोटर्सच्या जागतिक बाजारपेठेतील वाहन विक्रीत गेल्या महिन्याच्या तुलनेत वाढ झाल्यामुळे कंपनीच्या समभागात गुंतवणूकदार रस दाखवू लागले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून हा समभाग आतापर्यंत साधारणपणे (१७० ते २१५ रुपये) २५ टक्क्यांनी वाढला आहे. वाहन उद्योगात सध्या फारसे उत्साहवर्धक वातावरण नाही. गेल्या तीन महिन्यांत विक्रीचे आकडे घसरलेले आहेत. वाहनांसाठीचे सुरक्षाविषयक नवे नियम व त्यावर होणार खर्च तसेच पूरक उत्पादनांचे वाढते भाव यामुळे चालू आर्थिक वर्षांत या क्षेत्राकडून नफ्याची फारशी अपेक्षा नाही. परंतु येणाऱ्या सहा महिन्यांत नवीन सरकारकडून अर्थव्यवस्थेला गती मिळताच या क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य वाढू लागेल. वार्षिक निकाल जाहीर झाल्यावर संधी मिळताच या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक टप्प्याटप्प्याने वाढविण्यास हरकत नाही.

झी समूहामधील आर्थिक संकटामुळे काही म्युच्युअल फंडांच्या डेट फंड योजना संकटग्रस्त झाल्या आहेत. कोटक म्युच्युअल फंडाच्या काही एफएमपी योजना ज्या पुढील महिन्याभरात देय होत आहेत त्यांचे मुद्दल वेळेत परत न करण्याची नामुष्की फंड घराण्यावर ओढवली आहे. असाच काहीसा प्रकार जेपी मॉर्गनच्या फंडाबाबत २०१५ मध्ये झाला होता. जेव्हा या फंड घराण्याच्या दोन योजनांची अ‍ॅम्टेक ऑटोच्या रोख्यात गुंतवणूक होती. गुंतवणूकदार डेट फंड योजनांकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. समभागांच्या गुंतवणुकीमध्ये जोखीम अध्याहृत असते. यामधून एक धडा शिकायला हवा की डेट फंड योजनांना व्याजदर जोखमीप्रमाणे पत जोखीम (क्रेडिट रिस्क)देखील असते. ज्यामुळे कधी कधी अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा योजनांची गुंतवणूक कोणत्या कंपन्यांच्या वा सरकारी रोख्यांमध्ये आहे हे पाहणे व आपली गुंतवणूक वेगवेगळ्या योजनांत विभागून ठेवणे जरुरीचे आहे.

निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला असला तरी प्रचारात हवा तसा रंग अद्याप भरलेला नाही. पुढील महिना-दीड महिन्याच्या काळात राजकीय वातावरण ढवळून निघेल तशी बाजारातील अस्थिरताही वाढू लागेल. टीसीएस आणि इन्फोसिस आपले वार्षिक निकाल बाजार बंद झाल्यावर जाहीर करणार होते. त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात घट अपेक्षित असल्यामुळे या कंपन्यांचे बाजारमूल्यात नरमाई जाणवली. मात्र निकालांवरची खरी प्रतिक्रिया बाजार पुढील सप्ताहात देईल.

पहिला टप्पा पार पडला असला तरी प्रचारात हवा तसा रंग अद्याप भरलेला नाही. बाजारातील निवडणूकपूर्व उत्साह कमी होऊन गुंतवणूकदार सावध बनले आहेत. पुढील महिना-दीड महिन्यात राजकीय वातावरण ढवळून निघेल तशी बाजारातील अस्थिरताही वाढू लागेल..

sudhirjoshi23@gmail.com