सुधीर जोशी  sudhirjoshi23@gmail.com

गेले तीन आठवडे वर जाणारा बाजार या आठवडय़ात खाली आला. पहिल्या दोन दिवसांत बँकिंग क्षेत्रातील कंपन्या मोठय़ा तणावाखाली होत्या. रिझव्‍‌र्ह बँकेने पीएमसी बँकेपाठोपाठ लक्ष्मी विलास बँकेवर घातलेले निर्बंध व त्यामुळे इंडिया बुल्स हौसिंगच्या भविष्यातील बँकिंग परवाना मिळविण्यासाठी येऊ शकणाऱ्या अडचणी अशा एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या साखळीमुळे सर्वच बँकांचे समभाग पडले. यात येस बँक, आरबीएल यासारख्या कमकुवत बँकांचा मोठा वाटा होता. पहिल्या दोन दिवसांत बँक-निफ्टी निर्देशांक साडेतीन टक्क्यांहून जास्त खाली आला. वस्तू व सेवा कर संकलन, वाहन विक्रीचे निराशाजनक आकडे व जागतिक बाजारातील अस्वस्थता यामुळे बाजारावर दबाव राहिला. सप्ताहाची अखेर सेन्सेक्सने १,१५० अंश, तर निफ्टीने ३४० अंशांच्या साप्ताहिक घटीने केली.

कंपनी करामध्ये दिलेल्या सवलतींची एक लाभार्थी कंपनी म्हणजे आयटीसी लिमिटेड. कंपनीला या आर्थिक वर्षांत आयकरामध्ये बचत होईल, तसेच ई-सिगारेटवरील बंदीमुळे कंपनीच्या पारंपरिक व सर्वात जास्त फायदा देणाऱ्या सिगारेट उद्योगाची विक्री वाढू शकेल. प्लास्टिक बंदी व हॉटेल उद्योगावरील वस्तू व सेवा करामधील कपात कंपनीच्या पेपर व हॉटेल व्यवसायाला लाभकारक ठरेल. कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केलेल्या आकडेवारीवरून विश्लेषकांत मतभिन्नता असली तरी व्यापार चक्राच्या विविध टप्प्यांत विक्री आणि कंपनीने सातत्य राखले आहे. त्यामुळे सध्या २६० रुपयांच्या आसपास मिळणारा हा समभाग एक वर्षांच्या मुदतीमध्ये चांगला परतावा देईल.

ऑगस्ट महिन्यातील मूलभूत क्षेत्रातील विकासाचा दर अर्धा टक्क्यांनी घसरला. तसेच केंद्र सरकारची वित्तीय तूट पहिल्या पाच महिन्यांतच वार्षिक उद्दिष्टाच्या ७८ टक्के झाली आहे. त्यामुळे आधीच मंदीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेवर अधिकच ताण येणार आहे. सरकारला कंपन्यांना दिलेल्या कर सवलतीमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी सरकारी कंपन्यांतील भांडवल विकण्यावाचून पर्याय नाही. या सर्व नकारात्मक पाश्र्वभूमीवर ऑनलाइन विक्री करणाऱ्या दोन मोठय़ा कंपन्यांचे विक्रीचे आकडे बाजारातील उपभोग्य वस्तूंची मागणी कायम असल्याचे दर्शवितात.

कामकाजाच्या शेवटच्या दिवशी रिझव्‍‌र्ह बँकेने अपेक्षित असलेली व्याजदर कपात जाहीर करूनही भविष्यातील ‘जीडीपी’ वाढीचा दर ६.९ टक्क्यांवरून ६.१ टक्क्य़ांपर्यंत खालावण्याचा अंदाज बाजाराच्या पचनी पडला नाही. वृद्धीदराच्या अंदाजात मोठी कपात करताना व्याजदरातील अल्पशी कपात गुंतवणूकदार समुदायास पुरेशी वाटली नाही. या वर्षीच्या पावसात सरासरीपेक्षा दहा टक्के वाढ झाल्यामुळे खरीप पिकांच्या विक्रमी उत्पादनाची आशा तसेच जलविद्युत उत्पादन व पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ात दिलासा मिळून अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. रिझव्‍‌र्ह बँकेने घटविलेले व्याजदर यामुळे वर्षभरात बाजारात वरती वाटचाल करू लागेल असे दिसते.

बाजाराची पुढील दिशा दुसऱ्या तिमाही निकालांचे अंदाज आणि जागतिक बाजारातील घडामोडींवर निर्भर राहील.