सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

गेले दोन आठवडे विक्रमी शिखरे गाठणाऱ्या प्रमुख निर्देशांकांनी या आठवडय़ाच्या पहिल्या तीन दिवसांत मात्र उसंत घेतली. गुरुवारी डिसेंबरच्या सौदापूर्तीच्या व्यवहारात समभागात मोठी घसरण दिसून आली. परंतु आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात निर्देशांकांनी घेतलेल्या मोठय़ा उसळीने भांडवली बाजारातील तेजीची हवा नववर्षांसाठी कायम राहण्याचे संकेत दिले. साप्ताहिक तुलनेत सेन्सेक्समध्ये १०६ अंशांची, तर निफ्टी निर्देशांकात २६ अंशांची किरकोळ घसरण झाली.

नेस्ले, अल्ट्राटेक सीमेंट व टायटन या तीन कंपन्यांच्या सेन्सेक्समधील समावेशाने चालू आठवडय़ाची सुरुवात झाली. तर टाटा मोटर्स, येस बँक व वेदांता या कंपन्यांना निर्देशांकातून वगळण्यात आले. वाहन व्यवसायातील मंदी, इंडिकानंतर नॅनोसकट कंपनीच्या सर्वच प्रवासी वाहनांना मिळत असलेला ग्राहकांचा थंड प्रतिसाद, युरोपमधील व्यवसाय अधिग्रहणानंतर संथ झालेली चीनची अर्थव्यवस्था व ब्रेग्झिटचा तडाखा अशा कारणांमुळे टाटा मोटर्सच्या समभागाची गेली तीन वर्षे सतत घसरण सुरू आहे. तर थकीत कर्जे व व्यावसायिक अपारदर्शकता अणि प्रवर्तकांचा अवाजवी हस्तक्षेपाचा फटका येस बँकेला बसला. सेन्सेक्समधील समावेश हा कंपनीच्या भांडवलाच्या बाजार मूल्यानुसार ठरतो. अर्थातच अधिक बाजारमूल्य हे गुंतवणूकदारांचा कंपनीच्या भविष्यावरील विश्वासाचे प्रतीक असल्याने भविष्यात पोर्टफोलियोच्या स्थिर मूल्यसंवर्धनासाठी सेन्सेक्स वा निफ्टीमधील समभागांचा समावेश हा ठोकताळा उपयोगी पडतो.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या अहवालानुसार, सरकारी बँकांच्या बुडीत कर्जामध्ये गेल्या सात वर्षांत प्रथमच घसरण दिसून आली. मार्च २०१८ मधील ११.२ टक्क्यांच्या तुलनेत थकीत कर्जाचे प्रमाण मार्च २०१९ मध्ये ९.१ टक्क्यांवर आले. मोदी सरकारने लागू केलेल्या दिवाळखोरी कायद्याचा (आयबीसी) हा परिणाम आहे. नवीन कर्ज वाटपाचे प्रमाण जसे सुधारेल तशी बँकांची कामगिरीही सुधारेल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या दीर्घ मुदतीच्या रोख्यांच्या खरेदीचा निर्णयदेखील बँकांच्या नफ्यात वाढ करून देईल. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांचे समभाग नवीन वर्षांत आकर्षक राहतील.

पडझडीच्या या आठवडय़ात उठून दिसणारी वाढ झाली ती प्रामुख्याने टाटा स्टीलमध्ये, तर घसरण झाली रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात. गेल्या दोन वर्षांत ५० टक्क्यांनी घसरलेला टाटा स्टीलचा समभाग पुन्हा उभारी घेत आहे. जागतिक बाजारपेठेत व्यापार युद्धातील तह दृष्टीपथात आल्याने धातू उद्योगातील मंदी संपण्याची लक्षणे, ब्रेग्झिटच्या समाप्तीची शक्यता व कंपनी आपल्या भारतीय व्यवसायाची पुनर्रचना करून भागधारकांच्या गुंतवणुकीची मूल्यवाढ करण्याची शक्यता यामुळे हा समभाग नवीन वर्षांत फायदा मिळवून देईल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा गेल्या काही दिवसांत वेगाने वाढणारा समभाग नफावसुलीमुळे खाली आला आहे; परंतु आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ही खरेदीची संधी आहे.

वर्षभर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या या सदरात सरलेल्या आठवडय़ातील बाजाराचा आढावा, कंपन्या व अर्थ जगतातील घडामोडींवरील भाष्य करून सामान्य गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. सदराचा मुख्य उद्देश  गुंतवणूक शिफारशीचा नसला तरी अर्थ जगतातील घडामोडींकडे लक्ष ठेवून आपल्या पोर्टफोलियोची वृद्धी कशी साधता येईल याचे मराठी वाचकांना मार्गदर्शन करण्याचा हा प्रयत्न यापुढेही सुरूच राहील.’