24 November 2017

News Flash

घाऊक महागाई दर एक टक्क्याखाली!

मसाले, अंडी, मटण, मासे यांच्या किंमत दोन टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत.

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: July 15, 2017 1:41 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

अन्नधान्याच्या घसरलेल्या किमतीचा परिणाम

किरकोळ किमतींवर आधारीत महागाई दरापाठोपाठ सरलेल्या जून महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दरही किमान स्तरावर येऊन ठेपला आहे. भाज्या, फळे तसेच एकूणच खाद्यपदार्थाच्या किमती कमी झाल्याने जूनमधील घाऊक महागाई दराने उसंत घेतली आहे. ०.९० टक्के दर नोंदविताना त्याने गेल्या आठ महिन्यांतील तळ अनुभवला आहे.

गेल्या महिन्यातील आधी किरकोळ, तर आता घाऊक महागाई दरात कमालीचा उतार नोंदला गेल्याने रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या महिन्यात जाहीर होणाऱ्या पतधोरणातील व्याजदर कपातीची आशा अधिक भक्कम बनली आहे. देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनीही महागाई स्थिरावत असल्याने योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे सूतोवाच केले आहे.

वर्षभरापूर्वी, जून २०१६ मध्ये तो उणे स्थितीत (-) ०.०९ टक्के होता. तर आधीच्या, मे २०१७ मध्ये हा दर २.१७ टक्के राहिला आहे. जूनमधील किरकोळ महागाई दरही १.५४ टक्के नोंदविताना किमान स्तरावर राहिला होता. यंदा व्याजदर कमी होण्यास मेमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराचेही कारण पुरेसे असल्याचे मानले जात आहे.

घाऊक महागाई दराबाबत शुक्रवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अन्नधान्याचा महागाई दर घसरून ३.४७ टक्क्यांवर आला आहे. तर भाज्यांचे दर (-) २१.१६ टक्क्यांवर आले आहेत. सर्वाधिक घसरण बटाटय़ांच्या दरात नोंदली गेली आहे. बटाटे तब्बल ४७.३२ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत, तर डाळींच्या किमती २५.४७ टक्के कमी नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या महिन्यात कांद्याच्या किमती घसरून ९.४७ टक्के झाल्या आहेत.

मसाले, अंडी, मटण, मासे यांच्या किंमत दोन टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. इंधन, ऊर्जा गटातील महागाई दर मेमधील ११.६९ टक्क्यांवरून यंदा निम्म्यावर, ५.२८ टक्क्यांवर आली आहे. निर्मिती वस्तूंची महागाई २.२७ टक्के नोंदली गेली आहे. महागाई दराच्या नव्या मोजपट्टीत ६९७ खाद्य तसेच अन्य वस्तूंचा समावेश केला गेला आहे.

First Published on July 15, 2017 1:41 am

Web Title: wholesale inflation falls one percent in june