काही वर्षांपूर्वी मी रत्नागिरीत ‘श..शेअर बाजाराचा’ या व्याख्यानासाठी गेलो होतो. माझ्या प्रथेप्रमाणे तेथील एका मोठय़ा राष्ट्रीयीकृत बँकेच्या कार्यालयात जाऊन विभागीय अधिकारी (झोनल मॅनेजर) यांना भेटून व्याख्यानाचे निमंत्रण द्यायला गेलो. आपल्या सर्व शाखांतील कर्मचाऱ्यांना या व्याख्यानाला पाठवा जेणेकरून त्यांनाही विषयाची माहिती होईल व डिमॅट सेवा ते सुलभरीत्या देऊ शकतील अशी विनंती केली. हा व्याख्यानाचा कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि सीडीएसएलतर्फे आहे असे सांगताच त्या झोनल मॅनेजरनी मला झुरळ झटकावे तसे करीत, ‘‘छे, छे! आम्ही स्वत:च डिपॉझिटरी आहोत मग आम्हाला सीडीएसएलशी काय देणे घेणे?’’ इत्यादी वक्तव्य करून जणू काही मी वर्गणीच मागायला गेलो होतो अशा प्रकारे माझी बोळवण केली! खरे तर ती राष्ट्रीयीकृत बँक ही सीडीएसएलची एजंट म्हणजेच डीपी (डिपॉझिटरी पार्टिसिपंट) आहे स्वत: डिपॉझिटरी नव्हे इतकी साधी प्राथमिक बाब त्यांना माहीत नव्हती. मग अशा परिस्थितीत ते या डिमॅटचे काय भले करणार! त्याविषयी अधिक माहिती देऊ म्हटले तर इतका पूर्वग्रह धरून बसलेला तो माणूस माझे काही ऐकायच्या मन:स्थितीत नव्हता. अशी ही ‘ज्ञानी’ माणसे मोठय़ा पदावर अनेक वेळा बसलेली असतात तर मग कशी काय डिमॅट खाती उघडणार?  
खरे तर कर्मचाऱ्यांसाठी आमची व्याख्याने म्हणजे एक सुवर्णसंधी असते असे मानून त्यांना ही सर्व माहिती करून घेण्यासाठी उद्युक्त करणे ही वरिष्ठांची जबाबदारी. नेमके इथेच ते कमी पडतात. काही वर्षांपूर्वी अशाच एका बडय़ा राष्ट्रीयीकृत बँकेच्या नागपूर झोनल मॅनेजरबरोबर चर्चा करीत होतो. त्या बँकेने नागपुरात कार्मचाऱ्यांसाठी डिमॅट कार्यशाळा आयोजित केली होती. ऑनलाइन ट्रेडिंगसारख्या सोयी आता उपलब्ध असल्याने व्यवहार खूपच पारदर्शक आणि सोपे झाले आहेत वगरे माहिती मी सांगत असता ते म्हणाले, ‘‘ठाकूर, हे सर्व तुम्ही सांगता हे ठीक आहे पण दुर्दैवाने आमच्या बँकेत ही ऑनलाइन ट्रेिडगची सोय नाही ना!’’ मी म्हटले की, साहेब तीन वर्षांपूर्वीच ही सोय तुमच्या बँकेत सुरू झाली आहे. आता एका झोनल मॅनेजरचे हे अगाध अज्ञान मग तो सर्व शाखांना हेच सांगणार ना की, दुर्दैवाने आपल्या बँकेत ही सोय नाही! बरे ही ‘बहुमोल’ माहिती ऐकून काही कर्मचाऱ्यांना ती माहिती चुकीची असल्याचे जरी कळत असले तरी ते तसे न बोलता ‘होय बाबा आपल्याकडे ती सोय नाही’ असेच म्हणत राहणार. कारण अनायासे काम टळले! बँका, शेअर दलाल, डीपी, आरटीए, नियामक संस्थांमधील नियमांचा अतिरेक करणारी बाबू मंडळी, स्वत: गुंतवणूकदार अशा सर्व स्तरांतील मंडळींचा हातभार लागला आहे हा डिमॅटचा वटवृक्ष वाढू न देण्यामागे!!
खरे तर बँकेतील बचत खाते आणि डिमॅट खाते हे तत्त्वत: सारखेच आहे. फरक इतकाच की, बचत खात्यात आपण पसे ठेवतो तर डिमॅट खात्यात शेअर्स ठेवतो. बाकी खाते उघडण्यासाठी जी कागदपत्रे लागतात म्हणजे ‘केवायसी’ प्रक्रिया दोन्ही ठिकाणी जवळजवळ सारखीच आहेत. इतका हा विषय सोपा असताना फारच क्वचित बँकांचे कर्मचारी हे ग्राहकांना सांगून त्यांना डिमॅट खाती उघडायला प्रवृत्त करतात. मात्र अन्य बहुतेक ठिकाणी आनंदीआनंदच आहे. ‘‘इकडे कुणाला शेअर, डिमॅट यात रस असणार?’’ असे हे सर्वसाधारण वाक्य आम्हाला बँकांच्या शाखा शाखांमधून नित्यनेमाने ऐकवले जाते. तुम्ही योग्य प्रकारे माहिती दिली तर लोकांना रस निर्माण होणार ना!
दोन वर्षांपूर्वी सारस्वत बँकेने त्यांच्या मालवण शाखेतर्फे तिथे डिमॅट तसेच शेअर बाजाराविषयी मेळावा आयोजित केला होता. सुमारे १५० लोकांनी त्याला हजेरी लावली आणि सुमारे २५ लोकांनी डिमॅट खाती उघडलीदेखील. सोय उपलब्ध करून द्या, नीट माहिती त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगा, मग का नाही लोक शेअर बाजारात येणार? आज मालवणसारख्या खेडोपाडय़ात लोकांकडे पसे आहेत, पण ते योग्य जागी गुंतवायला मार्गदर्शन व माहिती देण्याची जबाबदारी बँका घेतील तर काय गरज आहे आम्हाला परदेशी गुंतवणूकदारांवर अवलंबून राहायची?