16 October 2019

News Flash

येस बँकेवर नवीन मुख्याधिकाऱ्याच्या नावनिश्चितीला १३ डिसेंबरचा मुहूर्त

मूडीजने पतमानांकन खाली आणलेल्या येस बँकेच्या समभागाचे मूल्य बुधवारी आणखी खाली आले.

नव्या पिढीतील खासगी बँक असलेल्या येस बँकेचे मुख्याधिकारी राणा कपूर यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव लवकरच रिझव्‍‌र्ह बँकेला कळविले जाणार आहे. दरम्यान, मूडीजने पतमानांकन खाली आणलेल्या येस बँकेच्या समभागाचे मूल्य बुधवारी आणखी खाली आले.

राणा कपूर यांना बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर ३१ जानेवारीपर्यंतच राहता येईल, असे आदेश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. बँकेच्या संचालक मंडळात उत्तम प्रकाश अगरवाल यांच्या रूपात एक सदस्य सहभागी झाले आहेत.

बँकेच्या संचालक मंडळाने मुख्याधिकाऱ्याची निवड प्रक्रिया सुरू केली असून बँकेकडे काही उत्सुकांची नावेही आली आहेत. पैकी पसंतीचे नाव रिझव्‍‌र्ह बँकेला १३ डिसेंबर रोजी कळविले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले . याच दिवशी बँकेच्या संचालक मंडळाचीही बैठक होत आहे.

नव्या मुख्याधिकाऱ्यासह बँकेच्या काही स्वतंत्र संचालकांचीही नियुक्ती होईल, असेही बँकेने जाहीर केले आहे. वाढते थकीत कर्जे तसेच बँकेतील अनियमिततेच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेने येस बँकेवर काही दिवसांपूर्वी र्निबध घातले आहेत. परिणामी बँकेच्या संचालक मंडळावरील तीन सदस्यांनीही बँकेकडे पाठ दाखविली. सध्या संचालक मंडळात सात सदस्य आहेत.

घसरणकळा कायम

  • येस बँकेचे समभाग मूल्य गेल्या काही दिवसांपासून सातत्याने खाली येत आहे. मूडीजच्या पतमानांकन घसरणीनंतर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी मूल्य घसरले. ११.७१ टक्के घसरणीमुळे मुंबई शेअर बाजारात दिवसअखेर १६१.७० वर समभाग स्थिरावला. कंपनीचे बाजारमूल्य जवळपास ५,००० कोटी रुपयांनी रोडावले. बुधवारच्या व्यवहारात त्याचा समभागाने वर्षभरातील मूल्यतळही अनुभवला.

First Published on November 29, 2018 1:31 am

Web Title: yes bank