येस बँक थकीत कर्जप्रकरणी ३० मार्च रोजी पुन्हा चौकशीची शक्यता

मुंबई : काळा पैसा प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेले येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी कर्जवाटप करताना लाच स्वीकारली का, याची चौकशी करणाऱ्या सक्तवसुली महासंचालनालयाने गुरुवारी रिलायन्स (एडीएजी) समुहाचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांचा जबाब नोंदवून घेतला. अंबानी यांना  चौकशीसाठी पुन्हा बोलाविण्यात आले आहे.

येस बँकेने अंबानी समुहाला सर्वाधिक म्हणजे १२ हजार ८०८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. हे कर्जही थकित असले तरी त्याची परतफेड केली जाणार असल्याचे रिलायन्स समुहाने गेल्याच आठवडय़ात पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

येस बँकेने आतापर्यंत ४२ हजार कोटींचे कर्ज बडय़ा उद्योगसमुहांना दिले असून या कर्जापोटी त्यांनी लाच स्वीकारली असल्याचा दाट संशय सक्तवसुली महासंचालनालयाला आहे. त्यामुळे या सर्व कर्जदारांना जबाब नोंदविण्यासाठी बोलाविले जाण्याची शक्यता आहे.

यापैकी सर्वाधिक कर्जाचा लाभ झालेल्या अनिल अंबानी यांना सोमवारी बोलाविण्यात आले होते. परंतु त्यांनी उपस्थित राहण्यापासून सवलत मागितल्याने त्यांना गुरुवारी पाचारण करण्यात आले होते.

कर्ज वितरणाची पद्धत कशी होती ते यासाठी काही लाच दिली का, आदी प्रश्न अंबानी यांना विचारण्यात आले होते, असे कळते. याबाबत काहीही सांगण्यास सक्तवसुली महासंचालनालयातील सूत्रांनी नकार दिला.

राणा कपूर यांच्या काळात कर्ज मिळालेल्या सर्वांनाच चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. यामध्ये एस्सेल ग्रुपशी संबंधित १६ हून अधिक कंपन्यांना आठ हजार ४१५ कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले होते.

खालोखाल दिवाण हौसिंग फायनान्स लि. (४,७३५),  इंडिया बुल (५,८००), ओमकार समुह (२,७१०), बुडीत खात्यात गेलेल्या आयएल अँड एफएस (२,५६८), रेडिअस ग्रुप (१२००), जेट एअरवेज (११००), गो ट्रॅव्हल्स (८००), सीजी पॉवर (५००) आदींचा समावेश असल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.