१० मेपर्यंत हिस्सा विक्री प्रक्रियेकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : काम नसले तरी सेवा कायम राहील असे आश्वासन जेटच्या व्यवस्थापनाने गुरुवारी आपल्या कर्मचाऱ्यांना दिले असले तरी इथल्या १६ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य १० मे नंतरच ठरणार आहे.

जेटच्या व्यवस्थापनाने बुधवारी रात्रीपासून आपली सेवा पूर्णपणे थांबविली. जेटने अनेक कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने वेतन दिलेले नाही. काम नसले तरी नोकरी जाणार नाही, असे आश्वासन सध्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना दिले आहे. १० मेपर्यंत जेट एअरवेज कंपनीतील हिस्सा विक्रीची प्रक्रिया संपवायची आहे. जी नवीन कंपनी जेट ताब्यात घेईल तिच्यावरच कर्मचाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असेल. ऑल इंडिया जेट एअरवेज ऑफिसर व स्टाफ असोसिएशन व जेट व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी जेटच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या बैठकीत ही बाब स्पष्ट झाली. या काळातील वेतनाची हमी देण्यास व्यवस्थापनाने नकार दिला.

गेल्या तीन महिन्यांपासून जेटच्या  कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यामुळे वैमानिकांसह अन्य कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल रोजी संपाची हाक दिली होती. मात्र जेट व्यवस्थापन व कंपनीचा हिस्सा असणाऱ्या स्टेट बँकेकडून काहीतरी तोडगा निघेल या आशेने संप पुढे ढकलण्यात आला होता. संघटनेतर्फे अध्यक्ष व आमदार किरण पावसकर यांनी व्यवस्थापनाशी बोलणी केली. कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सेवेशी निगडीत खाद्यपदार्थ पुरवणारे व अन्य कर्मचारी मिळून २२ हजार रोजगार अडचणीत आले आहेत. या बाबत कामगार मंत्रालय काहीही करत नसल्याचा आरोप पावसकर यांनी केला. १० मेपर्यंत कामावर येण्याचे आवाहन पावसकर यांनी केल असता कामावर जाऊन करणार काय असा उलट सवाल उपस्थित कर्मचाऱ्यांनीच पावसकर यांना केला.

सीबीआय चौकशीची मागणी

जेटचे प्रवासी अन्य कंपन्याकडे वळले असून त्यांनी विमान सेवांचे भाडे अव्वाच्या सवा वाढविले आहेत. हे पाहता हे कॉपरेरेट षडयंत्र तर नाहीना असा प्रश्न पडतो. या सगळ्याची सीबीआय चौकशी करावी.     – किरण पावसकर

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 thousand jet employees job in threat
First published on: 19-04-2019 at 01:16 IST