देशातील सर्वात मोठी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस (टीसीएस)ने १६,००० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजना बुधवारी जाहीर केली. कंपनीकडून भागधारकांना धनलाभ देणारी मागील चार वर्षांतील तिसरी योजना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांच्या हाती असलेले ५.३३ कोटी समभाग (भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १.४२ टक्के) प्रति समभाग ३,००० रुपये किमतीला खरेदी करण्याचे आणि त्यासाठी १६,००० कोटी रुपयांच्या (कर व संलग्न खर्च वगळता) रकमेचा विनियोग करण्याचा निर्णय घेतला. बुधवारच्या व्यवहारात टीसीएसचा समभाग पाऊण टक्क्यांच्या वाढीसह २,७३५.९५ रुपये किमतीवर दिवसअखेर स्थिरावला. हे पाहता पुनर्खरेदी योजनेसाठी निश्चित केलेल्या ३,००० रुपये किमतीतून भागधारकांना ९.६ टक्के अधिमूल्यासह धनलाभ होणार आहे.

कंपनीच्या ताळेबंदातील अतिरिक्त रोकड ही भागधारकांना जास्तीत जास्त परत करण्याच्या दीर्घकालीन भांडवली वाटप धोरणाचा भाग म्हणून टीसीएसने समभाग पुनर्खरेदीची परंपरा नेटाने निभावली आहे. वर्ष २०१८ मध्ये टीसीएसने १६,००० कोटी रुपये खर्चाची समभाग पुनर्खरेदीची त्या समयी विक्रमी मानली गेलेली योजना जाहीर केली. प्रति समभाग २,१०० रुपये किमतीला भागधारकांकडील समभाग त्या समयी खरेदी करण्यात आले होते. त्याआधी २०१७ सालात, प्रति समभाग २,८५० रुपये किमतीला टीसीएसने भागधारकांकडून समभाग खरेदी केली आहे. त्या त्या समयी बाजारात प्रचलित समभागाच्या भावाच्या तुलनेत १४ ते २० टक्के अधिमूल्य देऊन ही समभाग खरेदी कंपनीने केली आहे.

तिमाही नफा ७,४७५ कोटींवर; प्रति समभाग १२ रुपये लाभांश

मुंबई : टीसीएसने जुलै ते सप्टेंबर २०२० तिमाहीत ७,४७५ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा कमावणारी कामगिरी केली आहे. तिमाहीगणिक नफ्यात साधली गेलेली ही ६.७ टक्क्यांची वाढ असून, जी सध्या मंदी आणि करोनाग्रस्त काळात उत्साहदायी म्हणता येईल.

अमेरिकेतील एपिक सिस्टीम्स कॉर्पोरेशनशी न्यायालयीन तंटय़ासाठी १,२१८ कोटींच्या तरतुदीने नफ्याच्या प्रमाणावर परिणाम केला असताना, कंपनीची ही तिमाही कामगिरी विशेष दखलपात्र ठरते. कंपनीने भागधारकांना समभाग पुनर्खरेदीचा नजराणा दिलाच आहे, शिवाय प्रति समभाग १२ रुपये अंतरिम लाभांशही घोषित केला आहे.

‘‘सध्या आपण बहु-वार्षिक तंत्रज्ञानात्मक परिवर्तनाच्या चक्रातील पहिल्या टप्प्याची सुरुवातच पाहात आहोत. जसजसे हे टप्पे पुढे सरकतील तसे व्यवसायाचे नवीनतम मॉडेल विकसित करून, आमच्या ग्राहकांना उच्चतम व्यवसाय मूल्य मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’’

–  राजेश गोपीनाथन, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, टीसीएस

(तिमाही कामगिरीविषयी भाष्य करताना..)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16000 crore share repurchase scheme from tcs abn
First published on: 08-10-2020 at 00:03 IST