भारताच्या ९० टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार दळणवळणासाठी अवलंबून असलेल्या महत्त्वपूर्ण अशा सागरी क्षेत्राच्या नजीकच्या भविष्यातील प्रगतीबाबत आशादायक चित्र रंगविताना, दरसाल २० टक्के दराने वाढ करीत या क्षेत्रातील उलाढाल ८ कोटी अमेरिकी डॉलर (साधारण ५०० कोटी रुपयांवर) जाईल, असा उत्साहवर्धक कयास भारताच्या नौका निबंधक अर्थात इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंगचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन अरुण शर्मा यांनी व्यक्त केला. शर्मा यांच्या हस्ते मंगळवारी, दक्षिण आशियातील सर्वात मोठे मेरिटाइम प्रदर्शन ‘इन्मेक्स इंडिया २०१३’चे उद्घाटन झाले.
विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि बंदर संसाधने लाभलेल्या भारतासारख्या देशात सागरी व्यापार क्षेत्रात अमाप संधी उपलब्ध असल्याचे या प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या इफॉर्मा एक्झिबिशन्सचे संचालक गुरू प्रसाद यांनी सांगितले. ‘इन्मेक्स इंडिया २०१३’ प्रदर्शन व परिषद ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरदरम्यान मुंबई प्रदर्शन संकुल, गोरेगाव (पूर्व) येथे योजण्यात आले आहे. नौकानयन क्षेत्रातील कंपन्या, जहाज बांधणी/ जहाज बंधारे कंपन्या, बंदरे (सार्वजनिक व खासगी), नौदल, ऑफशोअर व तेल कंपन्या, उपकरण निर्माते, तटरक्षक, ड्रेजिंग कंपन्या, सागरी प्रशिक्षण व सेवा क्षेत्रातील संस्था, सरकारी संस्थांचे प्रतिनिधी तसेच व्यापारी आणि मनुष्यबळ पुरवठादार संस्थांच्या प्रतिनिधी परिषदेच्या वेगवेगळ्या चर्चात्मक सत्रांमध्ये सहभागी होत आहेत. या निमित्ताने उद्योग क्षेत्रातील अग्रणी, धोरणकर्ते आणि देशी व आंतरराष्ट्रीय ४० तज्ज्ञ एका व्यासपीठावर एकत्र येत आहेत. परिषदेच्या बरोबरीनेच आयोजित प्रदर्शनात सागरी क्षेत्रात वापरात येणाऱ्या विविध उपकरणे, उत्पादने यांचे प्रदर्शन व तंत्र-तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकही या निमित्ताने जनसामान्यांना पाहण्यासाठी खुले केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 rate increase possible to make progress in marine business sector captain arun sharma
First published on: 09-10-2013 at 12:12 IST