म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनांच्या गुंतवणूकदारांत सहामाहीत २१ लाखांची भर

आधीच्या चार वर्षांत मात्र गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने इक्विटी योजनांकडे पाठ फिरविल्याचे आढळून होते

पण वाढीचा दर अत्यल्प असल्याचा मतप्रवाह
चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीत म्युच्युअल फंडाच्या समभागसंलग्न (इक्विटी) योजनांमध्ये नव्याने २१ लाख गुंतवणूक खाती (फोलिओ) उघडली गेली. २०१४-१५ याआधीच्या संपूर्ण आर्थिक वर्षांत २५ लाख खाती उघडली गेली होती. पण एकाच गुंतवणूकदाराचे एकापेक्षा अधिक खाती असण्याची शक्यता असून, प्रत्यक्षात नव्या गुंतवणूकदारांचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याचाही मतप्रवाह आहे.
देशातील ४४ फंड घराण्यांसंबंधी ‘सेबी’कडे उपलब्ध माहितीनुसार, मार्च २०१५ अखेर समभागसंलग्न म्युच्युअल फंडांच्या योजनांमध्ये ३ कोटी १६ लाख ९१ हजार ६१९ गुंतवणूक खाती होती, ती सरलेल्या सप्टेंबरअखेर ३ कोटी ३८ लाख ४० हजार ९८१ पर्यंत म्हणजे २१.५ लाखांनी वाढली आहेत.
आधीच्या चार वर्षांत मात्र गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने इक्विटी योजनांकडे पाठ फिरविल्याचे आढळून होते. एप्रिल २०१४ मध्ये चार वर्षांनंतर प्रथमच म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांमधील गुंतवणूकदार संख्या वाढलेली दिसून आली. आधीच्या चार वर्षांत तब्बल दीड कोटी गुंतवणूक खाती बंद करण्यात आली होती. मार्च २००९ मध्ये म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांतील गुंतवणूक खात्यांची संख्या विक्रमी ४.११ कोटी अशी होती. २०१५-१६ पहिल्या सहामाहीत गुंतवणूक खात्यांमध्ये वाढीबरोबरच नव्याने ५३,६६६ कोटी रुपये गुंतवणुकीचा ओघ इक्विटी योजनांमध्ये आला आहे. इक्विटी योजनांतील गुंतवणुकीच्या ओढय़ामुळे सप्टेंबरअखेर म्युच्युअल फंडातील एकूण स्थिर उत्पन्न पर्यायातील गुंतवणूक जमेस गुंतणूक खात्यांची संख्या ४.४४ कोटींवर गेली आहे.
नवीन गुंतवणूकदार दूरच!
तथापि आधीच्या चार वर्षांत ज्या झपाटय़ाने म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांतून गुंतवणूक खात्यांचा ऱ्हास सुरू होता, त्या तुलनेत वाढीचे प्रमाण लक्षणीय नसल्याचे मत निर्मल बंग सिक्युरिटीजचे सल्लागार विजय मंत्री यांनी ‘लोकसत्ता’कडे बोलताना व्यक्त केले. स्थिर उत्पन्न योजनांतील गुंतवणूकदारांमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांची संख्या नगण्यच असून तेथे उच्च धनसंपदा असलेल्या एचएनआय गुंतवणूकदारांचा बोलबाला असल्याचे त्यांनी सांगितले.
आधीच्या चार वर्षांत म्युच्युअल फंडांपासून मोहभंग झालेले अनेक गुंतवणूक हे स्थावर मालमत्ता व सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले आणि तेथे अपेक्षित परतावा नाही आणि रोकडसुलभताही नसल्याने गेली दीड वर्षे भांडवली बाजार तेजीत असताना नव्या गुंतवणूकदारांचा ओघ कमी असल्याचे कारण विजय मंत्री यांनी दिले. शिवाय, मानधनावर मर्यादा घातली गेल्याने म्युच्युअल वितरकांची संख्या १ लाखावरून सध्या १० हजारांवर ओसरली आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी केवायसी सक्ती आणि पॅन कार्डधारक असणे बंधनकारक केले जाणे वगैरे घटकही नव्या गुंतवणूकदारांच्या संख्येत वाढ कमी असण्यामागे कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिवसा १२ हजार या दराने नवीन गुंतवणूक खाती उघडली जात असली तरी ती विद्यमान गुंतवणूकदारांमार्फत उघडली जात आहेत. आजच्या घडीला कोणत्याही बँकेकडे दिवसा उघडल्या जाणाऱ्या मुदत ठेव खात्यांच्या तुलनेत हा दर तोकडाच आहे.
’ विजय मंत्री
निर्मल बंग सिक्युरिटीज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 21 lakhs more investors in mutual fund

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या