आर्थिक वर्षांच्या दहा महिन्यात ३.६७ लाख कोटींची भर
म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीकडे पाहण्याचा सामान्य गुंतवणूकदारांचा उत्साही कल अविरत सुरू असून, लिक्विड, इन्कम आणि इक्विटी फंडांना गुंतवणूकदारांना मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर जानेवारीतील फंडातील एकूण गुंतवणुकीत ५४,००० कोटी रुपयांची भर पडली आहे.
एप्रिल ते जानेवारी या २०१६-१७ मधील पहिल्या १० महिन्यांमध्ये फंडातील एकूण गुंतवणूक ३.६७ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत नवीन गुंतवणूक ओघ अवघा १.८४ लाख कोटी रुपये होती.
भांडवली बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणात गुंतवणूकदारांनी यंदा फंडांना अधिक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे; तर किरकोळ गुंतवणूकदारांनी लिक्विड फंडासारखा पर्याय अधिक मात्रेने निवडल्याचे फंड्सइंडिया.कॉमचे मुख्याधिकारी श्रीकांत मीनाक्षी यांनी म्हटले आहे. समभाग निगडित फंडांबरोबरच रोख्यांशी संबंधित फंडांमध्ये यंदा गुंतवणूक वाढल्याचेही ते म्हणाले.
म्युच्युअल फंड कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्या ‘अॅम्फी’ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकेडवारीनुसार, जानेवारी २०१७ मध्ये फंडातील मालमत्ता ५३,८१७ कोटी रुपयांनी वाढली आहे. यामध्ये लिक्विड फंडातील गुंतवणूक २८,५८८ कोटी, तर इन्कम फंडातील गुंतवणूक १०,५४१ कोटी रुपये आहे. समभाग आणि समभाग निगडित म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ४,८८० कोटी रुपये झाली आहे.
जानेवारी २०१७ अखेर ४३ फंड कंपन्यांच्या विविध फंडातील मिळून एकूण गुंतवणूक १७.३७ लाख कोटी रुपये झाली आहे. डिसेंबर २०१६ अखेर ती १६.४६ लाख कोटी रुपये होती.
बॅलन्स्ड फंड अग्रेसर
मुंबई: गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांचा बॅलन्स्ड फंडांकडे ओढा लक्षणीय वाढला असून, २०१६ सालात या फंड वर्गवारीत दरमहा सरासरी १,७०० कोटींच्या गुंतवणूक ओघातून हे स्पष्ट होते. परिणामी एका वर्षांत या गटातील फंडांची मालमत्ता ५४ टक्क्यांनी फुगून डिसेंबर २०१६ अखेर ६४.९५४ कोटी रुपयांवर गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड फंडाची या वर्गवारीत कामगिरी ठळकपणे उजवी राहिली आहे. १ वर्ष, ३ वर्षे आणि ५ वर्षे कालावधीत या फंडाचा परतावा या वर्गवारीत अन्य सर्वापेक्षा सरस असा अनुक्रमे २३.७८ टक्के, २०.२० टक्के आणि १८.९१ टक्के असा राहिला आहे. दीर्घावधीत समभागसंलग्न गुंतवणूक अन्य सर्व पर्यायांच्या तुलनेत खूपच सरस परतावा देणारी ऐतिहासिकरीत्या सिद्ध झाले असले तरी, अल्प काळात बाजारातील वादळी चढ-उतार पाहता या गुंतवणुकीच्या परताव्यात सातत्य नसते. म्हणूनच जोखीम संतुलित परतावा हवा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमाल ६५ टक्के मर्यादेपर्यंत समभागांत गुंतवणूक असलेले बॅलन्स्ड फंड हा चांगला पर्याय ठरतात.