भारताचा आर्थिक विकास दर चीनच्या अर्थवृद्धीशी बरोबरी साधणारा असेल असे अंदाज व्यक्त होत असतानाच अर्थवृद्धी दराचे आकडे आणि विकास या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अर्थवृद्धीच्या आकडेवारीत वाढ म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत आहे असे नव्हे, असे प्रतिपादन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले.
सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या मापनाच्या पद्धतीत केलेल्या बदलांवर राजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागील आठवडय़ात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी चालू आर्थिक वर्षांअखेर वित्तीय तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्क्यांच्या आतच राहील, असे विधान केले होते. जेटली यांच्या अनुमानात सकल राष्ट्रीय उत्पादन हे जुन्या पद्धतीनुसार की नव्या पद्धतीनुसार गृहीत धरले गेले आहे, या प्रश्नावर राजन यांनी मतप्रदर्शन करण्यास असमर्थता व्यक्त केली.
केंद्रीय सांख्यिकी विभागाने लागू केलेली ही नवीन पद्धत रिझव्र्ह बँकही अवलंबणार काय, असा प्रश्न विचारला असता, कुठलीही पद्धत अवलंबण्यापूर्वी त्यासंबंधाने पुरेशी स्पष्टता व माहिती जमा असावी असा रिझव्र्ह बँकेचा कटाक्ष असेल, असे सांगत रिझव्र्ह बँक आपले धोरण ठरविताना जुन्याच पद्धतीचा वापर करील, असे त्यांनी सूचित केले. ते म्हणाले, ‘‘सरकारने महागाई दराचे दोन निर्देशांक जाहीर करण्यास २०१० मध्ये सुरुवात केली. रिझव्र्ह बँकेने मात्र आपल्या धोरणांसाठी किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांक वापरण्यास २०१३ नंतर सुरुवात केली.’’
डॉ. ऊर्जित पटेल समितीने जानेवारी २०१६ साठी निश्चित केलेले किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचे सहा टक्क्यांचे लक्ष्य गाठता येण्यासारखे निश्चितच आहे, असे राजन यांनी एका प्रश्नाच्या उत्तरदाखल सांगितले.