वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अतिवेगवान, नवयुगातील नवीन प्रकारच्या सेवा आणि व्यवसाय प्रारूपांची पायाभरणी करणाऱ्या ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावामध्ये अदानी समूहाने पदार्पणाची तयारी सुरू केली आहे. चालू महिन्यात २६ जुलैपासून ५ जी ध्वनिलहरींचा लिलाव पार पडणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडा-आयडियासह  गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने देखील आता  ५ जी ध्वनिलहरींच्या खरेदीसाठी उत्सुकता दर्शविली आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने शनिवारी ५ जी ध्वनिलहरींच्या लिलावात सहभागी होण्याची घोषणा केली. मात्र अदानी समूह दूरसंचार सेवा क्षेत्रात प्रवेश करणार नसल्याचे सध्या स्पष्ट करण्यात आले आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आणि सेवा विकसित करण्यासाठी सार्वजनिक नसलेले कॅप्टिव्ह ५ जी नेटवर्क तयार करण्याच्या सेवा देणार असल्याचे अदानी समूहाकडून सांगण्यात आले. विमानतळांपासून ते व्यवसायांना आधार देण्यासाठी खासगी नेटवर्क म्हणून ५ जी ध्वनिलहरींचा वापर करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये विमानतळ, बंदरे आणि वाहतूक (लॉजिस्टिक), वीज निर्मिती- वितरण आणि विविध उत्पादन क्षेत्रासाठी सेवा देणार असल्याचे अदानी समूहाच्या निवेदनात म्हटले आहे.

चालू महिन्यात होणाऱ्या लिलावात वीस वर्षांच्या कालावधीसाठी एकूण ७२,०९७.८५ मेगाहट्र्झ ध्वनिलहरी उपलब्ध करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने एकूण नऊ ध्वनिलहरींचा लिलाव करण्याची योजना आखली असून त्या अंतर्गत ७०० मेगाहट्र्झ, ८०० मेगाहट्र्झ, ९०० मेगाहट्र्झ, १,८०० मेगाहट्र्झ,  २,१०० मेगाहट्र्झ, २,३०० मेगाहट्र्झ, २,५०० मेगाहट्र्झ आणि  ३३००-३६७० मेगाहट्र्झ या ध्वनिलहरींचा समावेश असेल.

मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, आर्टिफिशियल इंटेलिजन्स इत्यादीसारख्या उपयोजनांची चाचणी आणि निर्मिती करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित कंपन्यांना थेट ध्वनिलहरी मिळवण्याचा मार्गही सरकारने मोकळा केला आहे. टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस अर्थात टीसीएससारख्या कंपन्यांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान आणि सेवा विकसित करण्यासाठी सार्वजनिक नसलेले कॅप्टिव्ह ५ जी नेटवर्क तयार करण्यात स्वारस्य दाखविले आहे. म्हणजेच काही कंपन्यांना स्वत:साठी विशेष ध्वनिलहरींचा वापर करता येणार आहे.

एअरटेलच्या समभागात ५ टक्के घसरण

मुंबई : अदानी समूह ५ जी क्षेत्रात पदार्पण करण्याच्या वृत्ताने सोमवारी प्रतिस्पर्धी कंपनी भारती एअरटेलच्या समभागात ५ टक्के घसरण झाली. ५ जी क्षेत्रातील स्पर्धा अदानी समूहाच्या या क्षेत्रातील पदार्पणाच्या अधिक तीव्र होण्याच्या शक्यतेने त्याचे प्रतिकूल पडसाद एअरटेलच्या समभागावर उमटले. परिणामी सोमवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेलचा समभाग ५.०३ टक्के म्हणजेच ३४.९५ रुपयांच्या घसरणीसह ६६०.३० रुपयांवर बंद झाला. भारती एअरटेलसह, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी समूह या चार कंपन्यांनी २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या ५ जी ध्वनिलहरींच्या पहिल्या लिलावात सहभागी होण्यासाठी अर्ज केले आहेत. या क्षेत्रातील अदानीच्या प्रवेशाने स्पर्धा वाढल्याने ध्वनिलहरी खरेदी करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.