सुमारे १०० अब्ज डॉलरच्या टाटा समूहातील अभियांत्रिकी सेवा क्षेत्रासाठी (ईएसओ) माहिती तंत्रज्ञान पुरविणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजीजने अमेरिकेतील कॅम्ब्रिक कॉर्पोरेशनवर ताबा मिळविला आहे. ३२.५ अब्ज डॉलरच्या या व्यवहारामुळे टाटाला मुख्यत्वे युरोपात व्यवसाय विस्तारता येईल. त्याचबरोबर आशिया पॅसिफिक भागातही कंपनीचे जाळे पोहोचेल.
ईएसओ क्षेत्रात अमेरिकेबरोबरच युरोपातही मोठय़ा प्रमाणात व्यवसाय करण्याची संधी असून नव्या व्यवसाय व्यवहारामुळे जागतिक स्तरावर बांधकाम आणि अवजड उपकरण क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान सेवा पुरविण्याच्या टाटा टेक्नॉलॉजीजचा विस्तार होत असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेट्रिक मॅकगोल्डरिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कॅम्ब्रिक कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी फ्लोरिन मुनटेनही या वेळी उपस्थित होते.
१७ विविध देशांमधील अस्तित्वाबरोबरच २५ देशांमध्ये सेवा देणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजीजचे ६,२८७ मनुष्यबळ आहे. कॅम्ब्रिक ताब्यात आल्यामुळे तिचे ४५० कर्मचारी टाटा समूहाच्या पंखाखाली आले आहेत. १९९७ ची स्थापना असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीजचा महसूल ३५ कोटी डॉलरच्या पुढे गेला आहे, तर १९८९ मध्ये अस्तित्वात आलेल्या कॅम्ब्रिकने डिसेंबर २०१२ अखेर २.५ कोटी डॉलरचा महसूल मिळविला आहे. येत्या पाच वर्षांत एक अब्ज डॉलरचा पल्ला गाठण्याची मनीषा ठेवणाऱ्या टाटा टेक्नॉलॉजीजचे सध्या ईसीओ क्षेत्रात २० टक्के योगदान आहे. कॅम्ब्रिकमुळे ते अधिक विस्तारण्यास मदत होईल.