* सुधीर जोशी

जागतिक बाजारातील पडझड व त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा तडाखा याचे परिणाम बाजारात याही सप्ताहात होतच राहिले. या कठीण काळात सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेज मिळण्याच्या शक्यतेमुळे बाजार उभारी घेत होता; परंतु करोनाच्या संकटात वाढ होण्याच्या भीतीमुळे एकंदर बाजाराचा कल नरमाईचाच राहिला. गेले सात आठवडे खाली येणारे प्रमुख निर्देशांक याही आठवडय़ात सात टक्क्यांनी घसरले.

विषाणू बाधेची झळ सर्वात जास्त बसली आहे आदरातिथ्य, विमान वाहतूक, पर्यटन अशा उद्योगांना. त्यामुळे अशा क्षेत्रांपासून गुंतवणूकदारांनी सध्या लांबच राहावे. याउलट दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू, औषधे व शक्तिवर्धके यांच्या वितरण व्यवस्थेमध्ये काही काळासाठी ताण आला असला तरी त्यांच्या खपावर प्रतिकूल परिणाम झालेला नाही.

किंबहुना मोबाइलचे डेटा पॅक, दूरचित्रवाहिन्या, साबण, शक्तिवर्धके, र्निजतुकीकरणासाठी लागणारी द्रव्ये यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. सार्वजनिक उपाहारगृहे बंद असल्यामुळे घरगुती जेवणासाठी तयार आटा, बासमती तांदूळ, मसाले, डाळी यांच्या किरकोळ विक्रीमध्ये वाढ अपेक्षित आहे ज्यामध्ये कंपन्यांचे नफ्याचे प्रमाण जास्त असते.

किरकोळ विक्री दालने असलेली रिलायन्स इंडस्ट्रीज, अ‍ॅव्हेन्यू सुपर मार्ट, फ्युचर रिटेल तसेच भारती एअरटेल अशा समभागांमध्ये सध्या केलेली गुंतवणूक वर्षभरात फायदा मिळवून देईल. वाहन उद्योगाबरोबर धातू उद्योग व पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांना पूर्वपदावर येण्यास जास्त अवधी लागेल. त्यामुळे त्यामधील गुंतवणुकीवर लाभ मिळण्यास थोडा काळ जावा लागेल.

माहिती तंत्रज्ञान उद्योगात या कालावधीत कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्यावर भर दिला आहे. डिजिटल व्यवहारांकडे सामान्यांचा ओघ वाढला आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन या क्षेत्राच्या पथ्यावर पडले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतीचा रंग आणि रसायन उद्योग लाभार्थी आहे. कन्साई नेरोलॅक, एशियन पेंट्स, बर्जर पेंट्स यांच्या नफा क्षमतेत वाढ अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीबरोबर सर्व लघुबचत योजनांचे व्याजदर नवीन वर्षांच्या पहिल्या तिमाहीकरिता कमी केले आहेत. येत्या वर्षांत व्याजदर वाढण्याची फारशी शक्यता नाही. त्यामुळे दरवर्षी नियमितपणे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनी या वर्षी त्यामध्ये केवळ शंभर रुपये जमा करून, समभाग मूल्यांकन आकर्षक असल्यामुळे, उर्वरित रकमेची चांगल्या ईएलएसएस म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.

करसवलतीसाठी या फंडांमध्ये कमीत कमी तीन वर्षांचा लॉकइन असल्यामुळे या दीर्घ मुदतीमध्ये सध्याची खरेदी मोठा लाभ देईल.

चीनमधील औद्योगिक परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स, औषध, रंग व रासायनिक उद्योगांना ही चांगली बातमी आहे व त्यामुळे बाजार लवकरच पुन्हा एकदा सुस्थितीत येण्याच्या आशा बळावल्या आहेत.

sudhirjoshi23@gmail.com