भारताचा ७.५ टक्क्यांचा आर्थिक विकास दर हा ‘सर्वोत्तम संभाव्य विकास दर’ निश्चितच नाही. नरेंद्र मोदीप्रणीत सरकारमध्ये अर्थोन्नतीला बळ देण्यासाठी अस्वस्थता असून, आम्ही येत्या वर्षांसाठी अधिक उमद्या विकास दराचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे, असे प्रतिपादन दहा दिवसांच्या अमेरिकेतील दौऱ्यावर असलेले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले.
गेल्या एका वर्षांत आपल्या सरकारने जे साध्य केले ते खूपच समाधानकारक असून, तरी भारतात यापेक्षा खूप अधिक करण्यासारखे आहे, अशी हुरहुर लागलेली असते, अशा शब्दात जेटली यांनी सरकारच्या आर्थिक वाटचालीचा बुधवारी रात्री येथे बोलताना वेध घेतला. भारताच्या अर्थव्यवस्थेची विश्वासार्हता पुन:स्थापित केली गेली आहे. पण तिला विद्यमान ७.५ टक्क्यांपेक्षा अधिक बहर फुटेल, यासाठी अविश्रांत धडपडही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, जेटली यांनी वर्षभरात सुरू राहिलेल्या आर्थिक सुधारणांचा धडाक्याला मिळालेले गुंतवणुकीचे पाठबळ, विशेषत: पायाभूत क्षेत्राच्या विकासात वाढलेली गुंतवणूक, कृषी क्षेत्र तसेच निर्माण क्षेत्रातील सुधार या गोष्टी देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप अधिक गती देणाऱ्या ठरतील, असे सांगितले.
चालू वर्षांत ८ टक्क्यांच्या विकास दराचे भाकीत करताना, आगामी काळात यापेक्षा अधिक विकास दराचे लक्ष्य सरकारपुढे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. गुंतवणुकीसाठी चीनपेक्षा भारताची आकर्षकता वाढली आहे, या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी दोहोंमध्ये अशी तुलना ते करीत नसल्याचे सांगितले. भारताचा अर्थवेग हा अलीकडचा आहे, तर चीन गेली तीन दशके सातत्याने ९ टक्के दराने प्रगती करीत आला आहे, असा त्यांनी खुलासा केला. ‘‘या तुलनेसाठी आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठावयाचा आहे. पण ते आपल्यापुढे एक चांगले उदाहरण निश्चितच आहे. भारतालाही दशक- दोन दशके ८-९ टक्के दराने विकास साधू द्या, तेव्हाच आपली अस्सल ताकद दिसून येईल.’’

जागतिक गुंतवणूकदारांना ‘कर-दिलासा’
देशात पुन्हा डोके वर काढत असलेल्या ‘कर दहशतशाही’च्या प्रश्नावर जेटली म्हणाले, ‘हे विशेषण माझ्यामुळेच सर्वतोमुखी बनले. पण त्या जाचाचा भारतात पुन्हा एकदा प्रत्यय येणार नाही, हे पाहणे ही माझीच जबाबदारी राहील.’’ बुरसटलेली प्रतिगामी कर व्यवस्था इतिहासजमा झाली असून, भारतात सध्या अत्यंत प्रगतिशील अशा प्रत्यक्ष कर प्रणालीचे पर्व सुरू असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. पुढील चार वर्षांत कंपनी कराचे प्रमाण हे २५ टक्क्यांपर्यंत म्हणजे जागतिक तुलनेत अत्यंत आकर्षक पातळीवर खालावणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जागतिक गुंतवणूकदारांना आर्थिक सुधारणापथाबाबत आश्वस्त करताना, जेटली यांनी गेल्या वर्षभरात देशात थेट विदेशी गुंतवणुकीत ३९ टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे दिवसाला एक या दराने ३५० गुंतवणुकीचे प्रस्ताव विदेशातून दाखल झाले आहेत. आगामी काळात आर्थिक सुधारणांचा परिणाम जसा स्पष्ट होईल तसतशी यात आणखी वाढ होत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जगातील सर्वात मोठय़ा शेअर बाजार- ‘न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज’च्या व्यवहार सांगतेचा घंटानाद करण्याचा मान बुधवारी रात्री भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मिळविला. १० दिवसांच्या अमेरिकेतील दौऱ्याचा प्रारंभ जेटली यांनी या कार्यक्रमातून केला. त्या प्रसंगी त्यांच्यासोबत, अम्बुजा नेवटिया समूहाचे अध्यक्ष हर्षवर्धन नेवटिया, अपोलो टायर्सचे अध्यक्ष ओंकार कन्वर, भारती एन्टरप्रायझेसचे उपाध्यक्ष राजन भारती मित्तल, ईस्टर्न एनर्जी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष वाय. के. मोदी आणि या बडय़ा उद्योजकीय शिष्टमंडळाच्या नेत्या व ‘फिक्की’च्या अध्यक्षा ज्योत्स्ना सुरी उपस्थित होत्या.