एटीएमवरील व्यवहार हिंदी भाषेत उपलब्ध असले तरी त्यातून येणाऱ्या पावत्यांवर हिंदी मजकूर छपाईसाठी विलंब लागण्याची शक्यता आहे. विविध बँकांसाठी एटीएमची उभारणी करणाऱ्या कंपन्यांकडे यासाठी आवश्यक अद्ययावत सॉफ्टवेअर प्रणालीच नसल्याने भाषाआग्रही खातेदारांना आणखी कळ सोसावी लागणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने वित्त खाते व रिझव्‍‌र्ह बँकेला एटीएममधून जारी करण्यात येणाऱ्या पावत्या हिंदीतून उपलब्ध करण्याची सूचना केली होती. याबाबत वित्त खाते अभ्यास करत असून नंतरच ती रिझव्‍‌र्ह बँकेला याबाबत आदेश देईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निदान हिंदी भाषक राज्यांमध्ये तरी एटीएममधील पावत्यांवर हिंदी भाषा असावी, असा आग्रह गृह मंत्रालयाने धरला आहे. टप्प्याटप्प्याने या सूचनेची अंमलबजावणी इतर राज्यांमध्ये स्थानिक भाषेनुसार करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.
वाणिज्यिक बँकांसाठी एटीएम उपलब्ध करून देणाऱ्या सध्या एनसीआर, विनकोर आणि डायबोल्ड या कंपन्या तीन कंपन्या आहेत. पैकी फक्त डायबोल्ड कंपनीच्या एटीएममध्येच हिंदी भाषेतील पावत्या जारी करण्याची सुविधा आहे. उर्वरित दोन्ही कंपन्यांना या सूचनेची अंमलबजावणी करावयाची झाल्यास कालावधी लागेल.
इंग्रजीबरोबरच हिंदी भाषेतूनही अशा पावत्या जारी करण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँक व बँक संघटना यांच्याच चर्चा सुरू असून कंपन्यांना आपल्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास सांगण्यात आले आहे. सध्या डायबोल्ड इंग्रजी, हिंदीव्यतिरिक्त अन्य सात भाषांमध्ये ही सुविधा देते.