जागतिक स्तरावर गुंतवणूक संधी

मुंबई : अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाने ‘अ‍ॅक्सिस ग्रोथ अपॉच्र्युनिटीज’ या नावाने नवीन योजना गुंतवणूकदारांसाठी खुली केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणुकीची संधी देणाऱ्या या योजनेतून प्रारंभिक टप्प्यात १,५०० कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

ही मुदतमुक्त समभाग संलग्न योजना असून, १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान तिचा प्रारंभिक गुंतवणूक कालावधी (एनएफओ) आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांकडून १,५०० कोटी रुपये या योजनेतून गोळा केले जातील, अशी अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाची अपेक्षा आहे. केवळ देशांतर्गत समभागच नव्हे तर आपले भागीदार श्रोडर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या सहयोगाने विदेशातील भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये या फंडातून गुंतवणूक केली जाईल.

विदेशांतील समभागांत (मुख्यत: लार्ज कॅप) एकूण ३५ टक्के  मर्यादेपर्यंत या योजनेतील निधी गुंतविता येणार आहे. ही बाब देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी फायद्याचीच ठरेल, असे प्रतिपादन अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि  मुख्याधिकारी चंद्रेश कुमार निगम यांनी केले. देशांतर्गत छोटय़ा-मोठय़ा आर्थिक घडामोडींच्या परिणामी भांडवली बाजारात होणाऱ्या उलथापालथीचे धक्के यातून गुंतवणूकदारांना आपोआपच पचविता येतील, असे ते म्हणाले.

जिनेश गोपानी हे ‘अ‍ॅक्सिस ग्रोथ अपॉच्र्युनिटीज’ या फंडाचे निधी व्यवस्थापक असतील. गुंतवणूकदारांना किमान ५,००० रुपये योजनेत गुंतविता येतील.