देशातील पहिल्या सूक्ष्म वित्त संस्थेचे वाणिज्यिक बँकेतील परिवर्तन अखेर रविवारी झाले. तिसऱ्या पिढीतील पहिली बँक म्हणून बंधन बँकेचा शुभारंभ पहिल्याच दिवशी ६० हजार खाती व ८० कोटी रुपये ठेवींसह झाला.
‘आपका भला, सबकी भलाई’ या ब्रिदसह सुरू झालेल्या बंधन बँकेचे उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते कोलकता येथे झाले. त्याचबरोबर बँकेच्या देशभरातील ५०१ शाखांची सुरुवातही झाली.
अनेक हुशार व्यक्तिमत्व घडविण्यासाठी पश्चिम बंगालची ओळख निर्माण झाली असताना या भूमितील बंधन बँक आता उद्यमशील नेतृत्वही घडवेल, असा विश्वास यावेळी जेटली यांनी व्यक्त केला. पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तर – पूर्व राज्यांमध्ये देशाचे एकूण सकल राष्ट्रीय उत्पादन वाढविण्याची क्षमता असून बंधन बँकेसारख्या माध्यमातून अन्य भागातील वाढत्या विकास दरासाठी केंद्र सरकार पाठबळ देईल, असेही अर्थमंत्री म्हणाले.
येत्या सात महिन्यात बँकेच्या शाखांची ६३२ तर २५० एटीएमची संख्या पार करण्याचा मनोदय यावेळी बँकेचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्र शेखर घोष यांनी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षअखेपर्यंत बँकेचे अस्तित्व देशभरातील २७ राज्यांमध्ये निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
देशातील विविध २४ शहरांमध्ये पहिल्याच टप्प्यातील ५०१ शाखांसह २,०२२ सेवा केंद्रे, ५० एटीएम कार्यरत झाले. १.४३ कोटी बँक खाती व १०,५०० कोटी कर्ज याद्वारे बँकेच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे.
२,५७० कोटी रुपये भांडवलासह बँक व्यवसाय सुरू करणाऱ्या बंधनने लवकरच ३,०५२ कोटी रुपयांच्या भांडवलाचे ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेची भांडवल मर्यादा ५०० कोटी रुपयांची आहे.
बँकेत सध्या १९,५०० कर्मचारी असून ७१ शाखा या ग्रामीण तर ३५ शाखा या बँक नसलेल्या भागात असतील. राज्यांमध्ये सर्वाधिक २२० शाखा या बंधनचे वर्चस्व असलेल्या पश्चिम बंगालमध्ये असतील. महाराष्ट्रात तिच्या २१ शाखा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bandhan bank starts operations with 501 branches
First published on: 25-08-2015 at 03:38 IST