लंडन/ जिनिव्हा : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हने बुधवारी व्याजदरात पाऊण टक्क्याची वाढ केल्यांनतर जगभरातील प्रमुख मध्यवर्ती बँकांनी तोच कित्ता गिरवत व्याजदर वाढीची घोषणा केली. ब्रिटनची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंड आणि स्वित्झर्लंडच्या स्विस नॅशनल बँकेने गुरुवारी व्याजदर वाढ केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात अर्ध्या टक्क्याची वाढ करत तो २.२५ टक्क्यांवर नेला आहे. मध्यवर्ती बँकेकडून गेल्या महिन्यातदेखील अर्ध्या टक्क्याची वाढ करण्यात आली होती. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे व्याजदर वाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. सध्या अमेरिकेसह युरोपीय देश अभूतपूर्व महागाईचा सामना करत आहेत. ब्रिटनमध्ये चलनवाढ १९८२ नंतरच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच ९.१ टक्क्यांवर पोहोचली आहे. जी बँक ऑफ इंग्लंडकडून निर्धारित दोन टक्के महागाई दराच्या लक्ष्यापेक्षा पाच पट अधिक आहे. शिवाय ब्रिटिश पौंड डॉलरच्या तुलनेत ३७ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे चलनवाढीला अधिक हातभार लागला आहे. ब्रिटनमधील महागाई दर चालू वर्षांच्या अखेरीस १३.१ टक्क्यांवर पोहोचेल आणि दीर्घकालीन मंदीला सुरुवात होईल, असे मध्यवर्ती बँकेने गेल्या महिन्यात इशारा दिला होता. 

स्वित्झर्लंडच्या स्विस नॅशनल बँकेने प्रमुख व्याजदरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ केली. मध्यम कालावधीत किंमत स्थिरता राखण्यासाठी व्याजदर वाढीचे समर्थन करत स्विस नॅशनल बँकेचे अध्यक्ष थॉमस जॉर्डन यांनी उणे ०.२५ टक्क्यांवरून व्याजाचे दर वाढवून ०.५ टक्क्यांपर्यंत नेले आहे. यामुळे स्वित्झर्लंडमधील अनेक वर्षांच्या नकारात्मक व्याजदरांचा अंत झाला आहे. स्वित्झर्लंड गुंतवणुकीसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानले जाते. यामुळे स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये निधी ठेवल्यास त्याबदल्यात ठेवीदाराला बँकेला व्याज द्यावे लागत होते. जगभरात इतरत्र रूढ असलेल्या ठेवीदाराला बचतीवर मिळणाऱ्या व्याज लाभाच्या अगदी विरोधाभासी अशी तेथे पूर्वापार प्रथा आहे.

आशियाई राष्ट्रांमध्ये बँक ऑफ जपानने गुरुवारी व्याजाचे दर आहे त्या पातळीवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. डॉलरपुढे गटांगळी खात असलेल्या ‘येन’ला सावरण्याचा उपाय म्हणून तिने हे पाऊल टाकले. तर चीनच्या मध्यवर्ती बँकेने जगात सुरू असलेल्या प्रवाहाच्या विपरीत व्याजदरात कपातीची वाट धरली आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या भूमिकेकडे लक्ष

चालू महिन्यात २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान मध्यवर्ती बँकेची पतधोरण आढाव्याची बैठक होत असून, त्यात पुन्हा व्याजदर वाढीचे पाऊल टाकले जाऊ शकेल, असा कयास अनेक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही आघाडय़ांवर वाढलेली महागाई हे रिझव्‍‌र्ह बँकेला अन्नधान्य आणि वस्तूंच्या वाढत्या किमतीबाबत दक्ष राहण्याची गरज असल्याचे सुचविते आणि त्यानुसार ३० सप्टेंबरला रेपो दरात ०.३५ टक्के ते अर्ध्या टक्क्याची वाढ अपेक्षित आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank of england swiss central bank hikes interest rates zws
First published on: 23-09-2022 at 05:54 IST