बाजाराबाबत सकारात्मकतेचा ‘यूटीआय एमएफ’ला विश्वास
बँकिंग क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी किरकोळ बँक ग्राहक/खातेदार हे नजीकच्या भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे आणि गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षांत बँकांच्या उत्पन्नामध्ये वाढच होईल, असा विश्वास यूटीआय म्युच्युअल फंडाच्या कार्यकारी उपाध्यक्षा व निधी व्यवस्थापक स्वाती कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रवासाबाबत आशा व्यक्त करताना कुलकर्णी यांनी यंदा अपेक्षित केले जाणाऱ्या अधिकच्या मान्सूनमुळे विशेषत: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भांडवली बाजाराचे चित्र तेजीचे असून या वाढीला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक कोणते आहेत ते गुंतवणूकदारांनी जाणून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून केले.
कंपन्यांच्या वित्तीय निष्कर्षांचा हंगाम सुरू झाला असून खासगी क्षेत्रातील बँकांमध्येही उत्साह दिसून येत असल्याचे निरिक्षण त्यांनी नोंदविले.
सिमेंट क्षेत्राबद्दल त्या म्हणाल्या की, मार्चमधील आकडेवारीत १० टक्क्य़ांपर्यंतची वाढ अपेक्षित असून भविष्यात ही वाढ कायम राहण्याबाबत शंका आहे. मात्र येत्या काही तिमाहींमध्ये या क्षेत्राबाबत वार्षकि मूल्यवाढ साध्य होऊ शकते आणि किंमतही सौम्य होऊ शकते, असेही ते म्हणाल्या.
रस्ते व रेल्वे गुंतवणूक वाढीस लागली की आíथक उलाढालीला वेग येईल आणि त्यामुळे प्रामुख्याने वाहन निर्मितीसारख्या क्षेत्र मागणीला चालना मिळू शकते. यातील काही गटांमध्ये अर्थव्यवस्थेची ग्रामीण बाजू गेल्या काही काळात मंदावली आहे; मात्र यंदा मान्सून चांगला झाला की त्यातही लवकरच वाढ दिसू लागेल, असे त्या म्हणाल्या.
जागतिक स्तरावरील काही घटनांमुळे भांडवली बाजारातील तेजी-मंदी मोठय़ा प्रमाणात राहिली. कंपन्यांच्या उत्पन्नात होणाऱ्या वाढीच्या बाबतीत चालू आर्थिक वर्ष चांगले जाईल या विचाराने मूल्यांकन रास्त होत आहे, असे त्या म्हणाल्या.
यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन भांडवली बाजाराबाबत अधिक सकारात्मक असायला हवे, असे त्यांनी सुचविले.
बँकांच्या कर्जातील वाढ निश्चितच या क्षेत्रातील कॉर्पोरेट ग्राहकांच्या तुलनेत किरकोळ खातेदारांच्या मार्फत होणाऱ्या व्यवसायवाढीवर आधारित आहे. कॉर्पोरेट बँकिंगच्या बाबतीत विचार करता नजीकच्या काळाचा विचार करायला हवा. हे लक्षात घेता, यासाठी चालना देणारा घटक अन्य खातेदारच ठरणार आहे. कॉर्पोरेट बँकिंगमधील कर्जभार अद्याप कमी झालेला नाही. अर्थव्यवस्थेतील भांडवली खर्च (कॅपेक्स) वाढू लागला की पत वाढेल. यामुळे मालमत्तेच्या गुणवत्तेशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. रिटेल बँकिंग अंतर्गत अर्थव्यवस्थेचा ग्रामीण पलू हळूहळू सुधारण्याची अपेक्षा आहे. यंदा चांगला मान्सून होऊन परिस्थिती सुधारण्याची आशा आहे.
– स्वाती कुलकर्णी, उपाध्यक्षा, यूटीआय म्युच्युअल फंड.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banking sector will boost
First published on: 31-05-2016 at 06:59 IST