वाढत्या सोने आयातीला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकार, अर्थमंत्री आणि रिझव्‍‌र्ह बँकेने कितीही र्निबध आणले तरी आयात कमी होणे अशक्य असल्याचा स्पष्ट प्रतिपादन ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’ या सराफ व्यवसायातील मुंबईस्थित जुन्या व प्रतिष्ठित संघटनेने केला आहे.
बँकांच्या सोने आयातीवर र्निबध आणले गेले, मात्र ६० ते ७० आयात करणाऱ्या खासगी निर्यातगृहांवर कोणतेही बंधन नसणे अशा या धोरणातील उणीवेकडे संघटनेने लक्ष वेधले.
अर्थव्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी ग्राहकांनी सोने खरेदी किमान वर्षभरासाठी टाळावी, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी केलेल्या विधानावर, ‘बॉम्बे बुलियन असोसिएशन’चे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी तीव्र आक्षेप घेत, असोसिएशनच्या वतीने नाराजी व्यक्त करणारे निवेदनही अर्थमंत्र्यांना धाडले आहे. सोन्यावरील आयातशुल्कात ८ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याचा निर्णय पथ्यावर पडल्याचे सांगत अर्थमंत्र्यांनी मे महिन्यातील व्यवहारातील पहिल्या १३ दिवसांमध्ये सोने आयात १३.५ कोटी डॉलरवरून ३.६ कोटी डॉलपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सोदाहरण सांगितले.
तथापि ही घट तात्पुरत्या स्वरूपाची असून, डॉलरच्या तुलनेत कमजोर झालेल्या रुपयाचा हा परिणाम असल्याचे कम्बोज यांनी सांगितले. प्रत्यक्षात चालू तिमाहीत २००-२२५ टन सोने आयातीची सरासरी पातळी पुन्हा गाठली जाईल, असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.
देशात आयात होणाऱ्या सोन्यापैकी ६०-७० टक्के आयात ही मोजक्या तारांकित निर्यातगृहांकडून होत असते, त्यांच्या आयातीवर कोणतेही र्निबध नसणे ही या धोरणातील मोठी उणीव आहे. त्यामुळे सोने आयातीबाबत सरकारला इच्छित परिणामही दिसणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यावसायिक स्वच्छता-सचोटीचे प्रयत्न!
‘रिद्धीसिद्धी बुलियन’वरील प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचे स्वागत
नुकतीच ‘रिद्धी-सिद्धी बुलियन लि.’वरील प्राप्तिकर विभागाचे छापे आणि त्यातून बाहेर पडणारी माहिती धक्कादायक असल्याची कबुली देत, मोहित कम्बोज यांनी मोठा मासा गळाला लावणारे पाऊल पडले याबद्दल समाधानही व्यक्त केले. या सराफ पेढी आणि तिचे प्रवर्तक पृथ्वीराज कोठारी यांचे सदस्यत्व असोसिएशनने सहा महिन्यांपूर्वीच निलंबित केले असून, असोसिएशनने त्यांच्या भ्रष्ट व अनैतिक कारवायांविरोधात या आधीच मोहिम सुरू केली असल्याचाही त्यांनी हवाला दिला. अशा मंडळींमुळे एकूण व्यवसायाची बदनामी होत असते आणि सराफ उद्योगातील अपप्रवृत्तींची अशा कारवायांनी साफसफाई होत असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे, असेही त्यांनी मत नोंदविले. शिवाय, सर्व सराफ व्यावसायिकांकडे सोने खरेदी-विक्रीचा भाव सामायिक असावा यासाठीही असोसिएशनचे प्रयत्न सुरू असून, ही प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण केली जाणे अपेक्षित असल्याचे कम्बोज यांनी सांगितले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay bullion association has doubt about decrease of gold import
First published on: 15-06-2013 at 12:03 IST