सेन्सेक्स३० हजारांखाली

भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांची सप्ताहअखेर मोठय़ा घसरणीने झाली. परिणामी सेन्सेक्स शुक्रवारी त्याच्या अनोख्या ३० हजारांच्या टप्प्याखाली उतरला, तर निफ्टीने त्याचा ऐतिहासिक उच्चांकही सोडला.

सत्रात २९,८२३.६०चा तळ अनुभवल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारच्या तुलनेत २६७.४१ अंश घसरणीसह २९,८५८.८० वर स्थिरावला, तर ७४.६० अंश घसरणीसह निफ्टी ९,२८५.३० वर थांबला.

मुंबई निर्देशांकाची शुक्रवारची एकाच सत्रातील घसरण ही २२ मार्चनंतरच्या ३१७.७७ अंश घसरणीनंतरची सर्वात मोठी ठरली. सेन्सेक्सने आधीच्या व्यवहारात २३१.४१ अंश वाढ नोंदविली होती. बाजारात गुरुवारी बँक कायद्यातील नव्या तरतुदींचे स्वागत झाले होते. राष्ट्रपतींनी याबाबतच्या विधेयकावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. साप्ताहिक तुलनेत मे महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात सेन्सेक्स व निफ्टीने अनुक्रमे ५९.६० व १८.७५ अंश घसरण राखली आहे.

गेल्या काही सलग व्यवहारांतील तेजीच्या जोरावर नफेखोरी म्हणून गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण सप्ताहअखेरचे व्यवहार करताना अनुसरले.सेन्सेक्समधील मूल्य घसरणाऱ्या समभागांमध्ये टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, गेल, रिलायन्स इंडस्ट्रिज हे राहिले. त्याचबरोबर पोलाद क्षेत्रातील समभाग २.४७ टक्क्यांपर्यंत घसरले.  मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकही घसरले.

untitled-17

रुपयाची २० पैशांनी आपटी

मुंबई : जागतिक अस्थिरतेच्या वातावरणाचा फटका शुक्रवारी भारताचे चलन अर्थात रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाचे मूल्य एकाच व्यवहारात तब्बल २० पैशांनी रोडावले. यामुळे प्रति डॉलर ६४.२८ रुपये असा पंधरवडय़ाचा तळ रुपयाने सप्ताहअखेर नोंदविला.

स्थानिक चलनाची १० एप्रिलनंतरची ही दिवसातील सर्वात मोठी आपटी ठरली. जागतिक भांडवली बाजारातील पडझड तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा गेल्या पाच वर्षांतील तळ यामुळे अमेरिकी चलन, डॉलर शुक्रवारी भक्कम बनले. परिणामी गुरुवारच्या ६४.१८ दरम्यानच्या प्रवासानंतर रुपयाने शुक्रवारच्या सत्राची सुरुवात ६४.२२ अशा किमान स्तरावरून केली. परकी चलन विनिमय मंचावर रुपया व्यवहारात ६४.३९ पर्यंत घसरल्यानंतर गुरुवारच्या तुलनेत त्यातील आपटी ही ०.३१ टक्क्यांची राहिली.

दरम्यान, मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये संमिश्र हालचाल नोंदली गेली. स्टॅण्डर्ड सोने तोळ्यासाठी ४० रुपयांनी वाढून २८,२३५ रुपयांवर पोहोचले, तर चांदीचा किलोचा दर २५ रुपयांनी कमी होत ३८,६२५ रुपयांवर स्थिरावले.