घाऊक किमतीवर महागाई दराने दिलेला उसासा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून होणाऱ्या पहिल्या भाषणाबद्दलच्या उत्सुकतेने निर्माण केलेल्या उत्साहाने शेअर बाजारात तेजीचा ध्वज गुरुवारीही डौलाने फडकत राहिला. सेन्सेक्सने सलग चौथ्या दिवशी १८४ अंशांची कमाई करीत, २६ हजारांपल्याड म्हणजे तीन सप्ताहांपूर्वीच्या उंचीवर पुन्हा उडी घेतली.
गेल्या शुक्रवारपासून सलग चार दिवसांत मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने ७७४ अंशांची (३.०६ टक्के) कमाई केली आहे. शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या सार्वजनिक सुट्टीनिमित्त बाजारात व्यवहार होणार नाहीत. त्यामुळे सप्ताहाअखेरचा दिवस असूनही बाजारात प्रारंभापासून खरेदीचा उत्साह दिसून आला. पहाटे खुल्या झालेल्या आशियाई बाजारांतील उतरंड तसेच दिवसाच्या मध्यान्हीला उघडलेले युरोपीय बाजारातील कमजोर सुरुवातही आपल्या बाजारातील खरेदीचा उत्साह कमी करू शकली नाही. बुधवारी ७१८.२७ कोटी रुपयांची बाजारात खरेदी करणाऱ्या विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही गुरुवारचा खरेदीतील जोर त्यापेक्षा जास्त असल्याचे उपलब्ध माहितीतून दिसून येते.
सेन्सेक्सने आजवरच्या इतिहासात सर्वप्रथम ३० जुलै २०१४ रोजी २६,०००ची शिखर पातळी ओलांडली होती.
 त्या दिवशी सेन्सेक्सने २६,०८७.४२ पातळीवर विश्राम घेतला होता. मधल्या पडझडीनंतर निर्देशांकाने ही गमावलेली पातळी पुन्हा मिळविली आहे.
७,८००ची  ‘निफ्टी’ला हुलकावणी
सेन्सेक्सच्या तुलनेत अधिक व्यापक असलेल्या निफ्टी निर्देशांकातही गुरुवारी ५२.१२ अंशांची दमदार वाढ झाली. या निर्देशांकाने ७,८०० अंशांच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली, पण दिवसभरात मात्र ही पातळी ओलांडण्यात त्याला अपयश आले. तरी ७,७९१.७० हा निफ्टी निर्देशांकाचा गुरुवारचा बंद झालेला स्तर हा तीन आठवडय़ांपूर्वीच्या उच्चांकाला पुन्हा फेर धरणारा आहे. उल्लेखनीय म्हणजे गुरुवारच्या बाजारातील सकारात्मकतेने गेल्या काही दिवसांत मार खाणाऱ्या बीएसई स्मॉल कॅप आणि सीएनएक्स मिडकॅप निर्देशांकांना उसळीचे बळ दिले. हे दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.१६ टक्के आणि ०.९९ टक्क्यांनी म्हणजे प्रमुख निर्देशांकांपेक्षाही अधिक प्रमाणात उंचावले.