नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्सने सोमवारी एकाच व्यवहारात जवळपास अडिचशे अंशांची आपटी नोंदविली. सव्वा महिन्यातील या सर्वात मोठय़ा घसरणीने मुंबई निर्देशांक २७ हजारापासून आणखी दुरावला.
२४४.४८ अंश घसरणीने सेन्सेक्स २६,८१६.५६ पर्यंत येऊन ठेपला. तर ६३.५० अंश नुकसानाने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ८,१०० च्या खाली येत ८,०४२ या गेल्या दोन आठवडय़ाच्या नीचांकावर विसावला.
आठवडय़ाच्या पहिल्या दिवसातील व्यवहारांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या चिंता वाहिल्याचे सोमवारी दिसून आले. चीनमधील अर्थव्यवस्थेची आकडेवारी तसेच अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदराची संभाव्य कपात यामुळे गुंतवणूकदारांनी पहिल्याच दिवसाच्या व्यवहारात समभागांची जोरदार विक्री केली. भारतातील विसावलेल्या महागाई दराचा बाजाराचा कल बदलण्यास काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, सत्रात ६१ च्या खाली गेलेल्या भारतीय रुपयाची धास्तीही व्यवहारावर दिसून आली.
पोलाद, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफेखोरी केली. तर औषधनिर्माण, बांधकाम क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. वधारलेल्या पाचमध्ये अन्य एचडीएफसी बँक, हीरो मोटोकॉर्प आणि इन्फोसिसचा समावेश राहिला. औषध क्षेत्रातील सिप्ला, डॉ. रेड्डीजमध्ये खरेदी झाली. सेन्सेक्समधील २५ समभाग घसरले.
२८ ऑगस्टनंतरचा सेन्सेक्सचा सोमवारचा बंद राहिला. तर ८ ऑगस्टनंतरची एकाच व्यवहारातील सर्वात मोठी घट निर्देशांकात नोंदली गेली. मुंबई शेअर बाजारात पोलाद निर्देशांक सर्वाधिक १.६९ टक्क्य़ांनी नुकसान सोसता झाला. तर पाठोपाठ तेल व वायू (०.९६%), माहिती तंत्रज्ञान (०.९६) क्षेत्राची नकारात्मक कामगिरी राहिली. मिड व स्मॉल कॅपची वधारणेचा प्रवास सोमवारीही कायम राहिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकसष्ठीने पुन्हा धास्ती; रुपया महिन्याच्या तळात
मुंबई : डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाने ६१ चा फेर धरत पुन्हा धास्ती निर्माण केली. सेन्सेक्सप्रमाणेच रुपयाने सप्ताहारंभीच एकाच व्यवहारात सव्वा महिन्यातील सर्वात मोठी आपटी नोंदवित चलनाला महिन्याच्या गाळात रुतविले. रुपया सोमवारअखेर शुक्रवारच्या ६०.६५ समोर ४८ पैशांनी कमकुवत बनला. परिणामी तो व्यवहारात ६१ च्याही खाली गेल्यानंतर ६१.१३ पर्यंत विसावला. चलन सोमवारी सकाळच्या सत्रात ६०.९२ वर स्वार झाले. लगेचच ते ६०.९० पर्यंत उंचावलेही. मात्र ६१ च्या खाली जात त्याने ६१.१८ हा दिवसाचा नीचांक नोंदविला. चलनाची दिवसातील आपटी ही ६ ऑगस्टच्या ६५ पैशानंतरची सर्वात मोठी राहिली. तर दिवसअखेरचा त्याचा स्तर हा १३ ऑगस्ट रोजीच्या ६१.२१ नंतरचा किमान नोंदला गेला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nse nifty fall most in over 5 weeks on weak global cues
First published on: 16-09-2014 at 12:52 IST