संक्षिप्त व्यापार : उद्वाहन, सरकत्या जिन्यांची भारत ही चीननंतरची मोठी बाजारपेठ

देशातील शहरीकरणाचा झपाटा आणि नव्याने विकसित होत असलेली आधुनिक शहरे पाहिल्यास, उद्वाहने आणि सरकत्या जिन्यांसाठी अद्ययावत साधनांची मागणी वाढणेही स्वाभाविकच आहे.

देशातील शहरीकरणाचा झपाटा आणि नव्याने विकसित होत असलेली आधुनिक शहरे पाहिल्यास, उद्वाहने आणि सरकत्या जिन्यांसाठी अद्ययावत साधनांची मागणी वाढणेही स्वाभाविकच आहे. याच कारणामुळे आज भारत ही चीननंतरची ही उपकरणे व तंत्रज्ञानाची जगातील दुसरी मोठी बाजारपेठ बनली असून, या क्षेत्रातील उलाढालीची मात्रा पाच हजारांवर जाणे अपेक्षित आहे. या क्षेत्रात जगभरात सुरू असलेले नवनवीन प्रयोग आणि उत्पादनांसह तब्बल १००० हून अधिक कंपन्यांचा समावेश असलेले भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ‘आयईई २०१४ (इंटरनॅशनल एलीव्हेटर अ‍ॅण्ड एस्कलेटर एक्स्पो)’ या नावाने आयोजिण्यात आले आहे. येत्या २० मार्च ते २२ मार्च या दरम्यान हे प्रदर्शन गोरेगावच्या मुंबई प्रदर्शन संकुलात होत असून, देशभरातील बिल्डर्स, विकसक, वास्तुविशारद, सिव्हिल इंजिनीयर्स, सल्लागार कंपन्या तसेच अभियांत्रिकी व वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन पर्वणीच ठरेल, असा आयोजकांनी दावा केला आहे.
जनकल्याण बँकेची महिलांसाठी ‘उद्योगिनी’ कर्ज योजना
मुंबई : आघाडीची नागरी सहकारी बँक असलेल्या जनकल्याण बँकेने अलीकडेच महिलादिनाच्या निमित्ताने ‘उद्योगिनी’ ही विशेष कर्ज योजना महिला उद्योजिकांसाठी सुरू केली आहे. तन्वी हर्बलच्या संस्थापक-संचालिका डॉ. मेधा मेहेंदळे यांच्या हस्ते मुलुंड येथील सुयोग सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यासमयी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे, संचालिका उज्वला करंबेळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम दाते यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना कर्ज वितरणही करण्यात आले. महिला उद्योजिकांना बँकांकडून वित्तपुरवठा व्हावा या उद्देशाने आलेल्या या योजनेचे वैशिष्टय़ म्हणजे कर्ज मिळविण्याचे पात्रतेचे निकष हे सोपे व सुटसुटीत असून, व्याजाचा दरही माफक आहे.
‘एलएनजी टर्मिनल’साठी विविध कंपन्यांची दिघी बंदराकडून चाचपणी
मुंबई : लिक्विफाइड नॅचरल गॅस अर्थात एलएनजी टर्मिनल उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरीचे सोपस्कार पूर्ण करणाऱ्या राज्यातील कोकण किनारपट्टीवरील दिघी बंदराने आता प्रत्यक्षात टर्मिनल उभारण्यासाठी विविध कंपन्यांशी बोलणी सुरू केली आहे. असे टर्मिनल साकारले तर तशी सुविधा असलेले हे राज्यातील हे दुसरे बंदर ठरेल. दिघी बंदराने या आधीच ६५० मीटर्सची जेट्टी या ठिकाणी कार्यान्वित केली असून, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्य़ांना लागून असलेली ही सर्वाधिक लांबीची जेट्टी ठरली आहे. तथापि एलएनजी टर्मिनल उभारण्यासाठी कोणकोणत्या कंपन्यांनी स्वारस्य दाखविले आहे आणि कोणत्या कंपनीबरोबर हा व्यवहार पूर्ण केला जाईल, याबाबत मात्र बंदर प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
‘अपना बाजार’च्या कार्याध्यक्षपदी अनिल गंगर
ग्राहक क्षेत्रात सहकाराची पायाभरणी करून, सहकारी डिपार्टमेंटल स्टोअर्सचे जाळे रचणारी अग्रेसर संस्था मुंबई कामगार मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेच्या (अपना बाजार) संचालक मंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत २० संचालक निवडण्यात आले. या संचालकांतून संस्थेचे कार्याध्यक्ष म्हणून अनिल गोंविदजी गंगर यांची तर उपकार्याध्यक्ष म्हणून श्रीपाद जगन्नाथ फाटक यांची एकमुखी निवड केली गेली. तर कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून ज्ञानदेव दळवी, संतोष सरफरे, नंदिनी गावडे आणि राजेंद्र विष्णू आंग्रे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. अरुण जाधव यांनी काम पाहिले.
विघ्नेष शहाणे ‘आयडीबीआय फेडरल लाइफ’चे नवीन मुख्याधिकारी
खासगी क्षेत्रातील प्रमुख आयुर्विमा कंपनी आयडीबीआय फेडरल लाइफ इन्श्युरन्सने आपले पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विघ्नेष शहाणे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक आणि सध्या या कंपनीचे हंगामी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी पाहत असलेले आर. के. बन्सल यांनी शहाणे यांची या पदावरील निवड जाहीर केली. शहाणे हे आजवर कंपनीच्या बँक-अश्युरन्स विभागाचे प्रमुखपद सांभाळत होते. आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत शहाणे यांनी अनेक आघाडीच्या वित्तीय संस्थांमध्ये विक्री व्यवस्थापन, रणनीती, नवीन व्यवसाय विकास असे अनेक व्यावसायिक पैलू कौशल्याने हाताळले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Business short news

ताज्या बातम्या