एमसीएक्स या देशातील वस्तू बाजार मंचावर पाच नव्या संचालक सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये दोन स्वतंत्र, तर तीन भागधारकांचे संचालक आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भागधारकांच्या तीन संचालक मंडळांमध्ये सार्वजनिक बँकांचे व्यवस्थापक पदावरील व्यक्ती आहेत. के. एन. रघुनाथन (युनियन बँक ऑफ इंडिया), संजया अगरवाल (बँक ऑफ बडोदा) व पी. परमशिवम (कॉर्पोरेशन बँक) अशी त्यांची नावे आहेत. दोन स्वतंत्र संचालकांची नावे जी. अनंत रमण व प्रविर वोहरा अशी आहेत. दरम्यान, संचालक मंडळाने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत जवळगेकर यांचा राजीनामा स्वीकृत केला. नवीन व्यक्ती येत नाही तोपर्यंत या पदाची जबाबदारी तूर्त उपव्यवस्थापकीय संचालक (बिगर मंडळ) प्रवीण कुमार सिंघल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तथापि, ५६०० कोटी रुपयांची देणी थकविणाऱ्या घोटाळेग्रस्त एनएसईएलचे प्रवर्तक असलेले जिग्नेश शाह हे मात्र एमसीएक्सच्या संचालक मंडळावर भागधारकांच्या नाखुषीनंतरही कायम राहिले आहेत.

स्मार्टफोन्सवर ऑनलाइन उलाढालींसाठी आता डिजिटल ‘बिस्कूट’ चलन!
मुंबई: भारतात अगदी छोटय़ा शहरांपर्यंत उत्तरोत्तर स्मार्टफोन्सचा विस्तारत असलेला ग्राहक पाया पाहता, या माध्यमातून मूल्यवर्धित सेवा आणि अॅप्सचा वापरही ओघानेच वाढणे अपेक्षित आहे. परंतु जनसामान्य ग्राहकांसाठी या डाऊनलोड्साठी पैशांचा भरणा क्रेडिट अथवा डेबिट कार्डाऐवजी अधिक सोपा व सहज करणारा डिजिटल चलनाचा पर्याय शॉर्टफॉरमॅट डिजिटल प्रॉडक्शन प्रा. लि.ने पुढे आणला आहे. सध्याच्या घडीला देशातील मोबाईलकर्त्यांकडून दरडोई ध्वनी आणि मूल्यवर्धित सेवांसाठी ९५ रुपये वार्षिक असा आहे, तो नव्या बिस्कूट या डिजिटल चलनाच्या उपलब्धतेमुळे आगामी वर्षांत दरडोई १५० रुपयांवर जाईल, असा उत्साही कयास शॉर्टफॉरमॅटच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्याधिकारी नियती शाह व्यक्त करतात. त्यांच्या कंपनीने दाखल केलेल्या ‘बिस्कूट डिजिटल प्रीपेड वॉलेट’ आणि बिस्कूट या नावानेच सुरू झालेल्या ऑफलाइन अॅप स्टोअरचे बुधवारी अनावरण झाले. देशभरातील १० हजारांहून अधिक मोबाइल रिचार्ज करणाऱ्या दालनांमध्ये ही दोन्ही उत्पादने उपलब्ध असतील. ज्यायोगे स्मार्टफोनधारकांना विविध भाषांमधील मनोरंजनपर कंटेंट माफक दरात खरेदी/डाऊनलोड करता येईल.

‘झायलो’चा नवा नऊ आसनी बाज!
मुंबई: स्पोर्ट युटिलिटी श्रेणीतील महिंद्र समूहाने तिच्या लोकप्रिय झायलोचे नवे वाहन बुधवारी मुंबईत सादर केले. याद्वारे कंपनीने नऊ आसनी वाहन उपलब्ध करून दिले आहे. झायलो डी२ मॅक्स नावाच्या या वाहनात २.५ लिटर डिझेल सीआरडी इंजिन बसविण्यात आले आहे. बीएस३ व बीएस४ पर्यावरणपूरक दर्जापात्र हे वाहन १४.९५ किलोमीटर प्रति लिटरप्रमाणे धाऊ शकते. वाहनचालक व अन्य अशी नऊ आसनी रचना प्रथमच झायलोत अस्तित्वात आली आहे.