हॅथवे, डेनमध्ये निम्म्याहून अधिक मालकी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीजने असंघटित म्हणून ओळखला जाणारा केबल आणि ब्रॉडबँड सेवांचा व्यवसायही आपल्या मक्तेदार पंखाखाली घेणारी पावले टाकली आहेत. या क्षेत्रातील आघाडीच्या देशभरात १,१०० शहरांमध्ये अस्तित्व असलेल्या डेन नेटवर्क्‍स आणि हॅथवे केबल अँड डेटाकॉममध्ये ५१ टक्क्य़ांहून अधिक भागभांडवली हिस्सा खरेदी करण्याचा मानस रिलायन्सने व्यक्त केला आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील वाढीव नफा व महसुलाचे वित्तीय निष्कर्ष बुधवारी जाहीर करताना, मुकेश अंबानी या  व्यवसाय संपादन व्यवहाराची घोषणा केली. याकरिता ५,२३० कोटी रुपयांची तरतूद रिलायन्स समूहाने केली असल्याचे त्यांनी सांगितले. डीटीएच, केबल टीव्ही तसेच केबल ब्रॉडबँड व्यवसायात बस्तानाचे मनसुबे असताना, रिलायन्स एका फटक्यात थेट २७ हजार स्थानिक केबल ऑपरेटपर्यंत पोहोचणार आहे.

रिलायन्सच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी यांनी ‘जिओ गिगा फायबर’ आणि ‘जिओ स्मार्ट होम सोल्युशन’ या दोन कंपन्यांबाबत सूतोवाच केले होते. यामाध्यमातून केबल टीव्ही आणि केबल ब्रॉडबँड क्षेत्रात शिरकाव करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला होता.

दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने दोन वर्षांत २५.२३ कोटी ग्राहकसंख्येसह मोबाइलवरील इंटरनेटवर वर्चस्व स्थापले आहे. दळणवळण क्षेत्राशी निगडित अन्य व्यवसायातही शिरकाव करताना हॅथवे केबल व डेन नेटवर्क्‍सवर ताब्यातून रिलायन्स मोठी मजल मारणार असे मानले जाते.

रिलायन्स जिओने सरलेल्या तिमाहीत ११.३ टक्के वाढीसह ६८१ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीदरम्यान समूहाच्या या व्यवसायाला २७१ कोटी रुपयांचा तोटा सोसावा लागला होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cable broadband service is also a part of reliances monopoly
First published on: 18-10-2018 at 02:23 IST