स्वत:हून पायउतार होण्यासही सांगितले होते; रतन टाटा यांची स्पष्टोक्ती

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायरस मिस्त्री यांच्यावरील विश्वास गमाविल्यानंतर आणि त्यांच्या योग्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतरच अध्यक्षपदावरून त्यांना दूर करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला, असे टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यांना स्वत:हून पायउतार होण्यासही सांगण्यात आले होते; मात्र त्यांनी ते मान्य न केल्याने टाटा सन्सच्या संचालक मंडळाला कठोर निर्णय घ्यावा लागला

[jwplayer JgPB5Ew2]

रतन टाटा यांनी भागधारकांना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या पत्रात, मिस्त्री यांच्या हकालपट्टीच्या प्रस्तावाचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. टाटा या पत्रात म्हणतात की, मिस्त्री यांना चार वर्षांपूर्वी समूहाच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. मात्र कारवाईच्या काही दिवस आधीपासून मिस्त्री यांच्याबरोबरचे संबंध दुरावले. माझ्या नजरेत त्यांचे स्थान सतत खालावत होते. त्यांचे कंपन्यांच्या संचालक मंडळावर राहणे हे फुटीला कारण ठरू शकते, असेही आढळून आले. म्हणून त्यांच्या हकालपट्टीच्या बाजूने विशेष सर्वसाधारण सभेत मतदान करावे.

टाटा यांनी बुधवारी प्रथमच सायरस मिस्त्रींविरुद्ध आपले स्पष्ट मत जाहीररीत्या प्रदर्शित केले. यापूर्वी मिस्त्री यांच्या प्रत्येक विधान, आरोपांचा टाटा सन्स व समूहाच्या प्रवक्त्यांमार्फत इन्कार करण्यात आला होता. रतन टाटा यांनी बुधवारी टाटा सन्सच्या भागधारकांना थेट पत्र लिहून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचे समर्थन केले. मिस्त्री यांनीही मंगळवारी भागधारकांना पत्र लिहून आपल्या निष्कासनाविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन केले होते.

टाटा समूहाच्या गेल्या दीडशे वर्षांच्या उल्लेखनीय कारकीर्दीचा उल्लेख करत रतन टाटा यांनी याबाबतच्या पत्रात भागधारकांच्या, उपकंपन्यांच्या, समूहाच्या हितार्थ मिस्त्री यांना दूर करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. टाटा समूहाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मिस्त्रींविरुद्ध मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याकरिता टाटा यांनी या पत्रात भागधारकांची मनधरणी केली आहे. मिस्त्री यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी समूहातील सहा कंपन्यांची विशेष सर्वसाधारण सभा याच महिन्यात होत आहे.

[jwplayer sxSF8A8s]

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyrus mistry ratan tata
First published on: 08-12-2016 at 01:51 IST