scorecardresearch

कर्ज व्याजदर महागणे अपरिहार्य; रिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून दरनिश्चितीसाठी बैठक

रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर निश्चितीसाठी तीन दिवसांची बैठक बुधवारपासून सुरू होत असून बँकेकडून अर्ध्या टक्क्यापर्यंत रेपो दरात वाढ अटळ मानली जात आहे.

कर्ज व्याजदर महागणे अपरिहार्य; रिझव्‍‌र्ह बँकेची आजपासून दरनिश्चितीसाठी बैठक
( रीझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) )

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेची व्याजदर निश्चितीसाठी तीन दिवसांची बैठक बुधवारपासून सुरू होत असून बँकेकडून अर्ध्या टक्क्यापर्यंत रेपो दरात वाढ अटळ मानली जात आहे. अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हसह जगभरातील प्रमुख बँकांनी महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत आक्रमकपणे व्याजदरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेकडूनदेखील तोच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने (एमपीसी) चालू आर्थिक वर्षांत मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात १४० आधार बिंदूंची वाढ केली आहे. सर्वप्रथम मे महिन्यात ४० आधार बिंदूंची वाढ करण्यात आली. त्यांनतर जून आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली. येत्या शुक्रवारी, ३० सप्टेंबरला शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील समिती व्याजदराची घोषणा करतील. सध्या रेपो दर ५.४ टक्के असून त्यात अर्ध्या टक्क्याची वाढ करण्यात आल्यास तो ५.९ टक्क्यांवर पोहोचेल.

रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकार एकत्रितपणे महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न करत असूनही सरलेल्या ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर सात टक्क्यांवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, मध्यवर्ती बँकेकडून चालू महिन्याअखेरीस नियोजित बैठकीनंतर, रेपो दरात ०.३५ ते ०.५० टक्क्यापर्यंत व्याजदर वाढ अपेक्षित आहे. सलग आठव्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेसाठी सहनशील असणाऱ्या सहा टक्के या कमाल पातळीपेक्षा किरकोळ महागाई दर अधिक राहिला आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाई दराने ६.७१ टक्क्यांची पाच महिन्यांतील नीचांकी पातळी गाठल्यानंतरही, ऑगस्टमध्ये तो पुन्हा वाढून ७ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचला. अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या कडाडलेल्या किमतींनी, किरकोळ महागाई दरात ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाल्याचे सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. किरकोळ आणि घाऊक अशा दोन्ही आघाडय़ांवर वाढलेली महागाई हे रिझव्‍‌र्ह बँकेला अन्नधान्य व वस्तूंच्या वाढत्या किमतीबाबत दक्ष राहण्याची गरज असल्याचे सुचवित आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या