मुंबई : चलनवाढीसंबंधी अनुमानच व्याजदरासंबंधी आगामी कल निर्धारित करतील, असे स्पष्ट करताना घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरातील तीव्र वाढीची परिणामकारकतेच्या अंगाने दखल घेणे भाग ठरेल, असे रिझव्‍‌र्ह बँकेने शुक्रवारी स्पष्ट केले. मध्यवर्ती बँकेचे  पतविषयक धोरण हे जरी किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराच्या पातळीला लक्ष्य करून ठरत असले तरी, घाऊक महागाई दरातील मोठी वाढ ही किरकोळ वस्तूंच्या किमतींवर पुढे जाऊन दबाव निर्माण करते, त्यामुळे त्या दराबाबत सावधगिरी आवश्यकच ठरते असे तिने ताज्या अहवालातून संकेत दिले.

जागतिक पातळीवरील प्रतिकूल भू-राजकीय परिस्थितीमुळे औद्योगिक कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, वाहतूक खर्च आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळय़ांमुळे वस्तू आणि सेवांच्या किमतींवर परिणाम होत आहे. यातून ग्राहकांच्या हाती पडणाऱ्या वस्तू आणि सेवा महागडय़ा होत जाण्याची थेट परिणती दिसून येत असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

घाऊक ते किरकोळ असे महागाईच्या संक्रमणाबाबत सावधगिरी गरजेची असल्याचे मध्यवर्ती बँकेने अहवालात नमूद केले आहे. प्रतिकूल बाह्य परिस्थितीचा परिणाम म्हणून उत्पादित वस्तूंच्या किमतीतील तीव्र वाढीदरम्यान घाऊक आणि किरकोळ किमतीवर आधारित महागाई दरातील लक्षणीय तफावतीमुळे, विलंबाने का होईना किरकोळ चलनवाढीची मात्राही धोकादायक पातळीवर जाईल. अर्थव्यवस्थेतील सुस्ततेमुळे हे संक्रमण  ठळकरूपात नसले तरी सुरू आहे, याची मध्यवर्ती बँकेने नोंद घेतली आहे.

रशिया-युक्रेनमधील संघर्षांमुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तसेच जागतिक पुरवठा साखळीमध्ये निर्माण झालेल्या अडचणींमुळे अन्नधान्याबरोबरच प्रमुख जिन्नसांच्या किमतीत वाढ झाली आहे. ज्यातून उर्वरित जगाप्रमाणेच भारतात देखील महागाई दरात तीव्र वाढ झाली असल्याचे अहवालाने नमूद केले आहे. वाढत्या महागाईच्या झळांपासून सामान्यांना दिलासा मिळावा आणि महागाई दरात उतार म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कात कपात केली. तसेच पोलाद आणि प्लास्टिक उद्योगात वापरल्या जाणाऱ्या काही कच्च्या मालावरील आयात शुल्कही माफ केले.

याशिवाय लोहखनिजावरील निर्यात शुल्क वाढवण्यात आले. देशांतर्गत पातळीवर इंधनापासून, अन्नधान्य, भाजीपाला आणि खाद्यतेलापर्यंत सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये १५.०८ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे आणि किरकोळ महागाई दर ७.७९ टक्के अशा आठ वर्षांच्या कळसाला गाठणारा राहिला आहे. यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेने चालू महिन्यात रेपोदरात थेट ०.४० टक्क्यांची वाढ केली होती.

शाश्वत अर्थवृद्धीसाठी सुधारणांवर भर आवश्यक

मुंबई : करोनाच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी अर्थव्यवस्थेत संरचनात्मक सुधारणा निरंतर होत राहाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत रिझव्‍‌र्ह बँकेने या आघाडीवरील सरकारच्या भूमिकेलाही अधोरेखित केले. भविष्यातील सर्वसमावेशकवाढीसाठी पुरवठय़ाच्या बाजूने असणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून पतविषयक धोरणांच्या माध्यमातून महागाई नियंत्रणात राखणे आणि भांडवली खर्चाला चालना देणे आवश्यक आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेने वार्षिक अहवालात म्हटले आहे. करोनानंतरच्या काळात संरचनात्मक सुधारणांच्या माध्यमातून शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक वाढ आवश्यक असल्याचे तिने नमूद केले. यासाठी कामगार कौशल्य विकास आणि नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कामगारांना उत्पादकता वाढवण्यासाठी सक्षम करणे आवश्यक असल्याचे तिने अहवालातील ‘मूल्यमापन आणि संभाव्यता’ या प्रकरणात म्हटले आहे.