‘कृपया सीट बेल्ट बांध ले और अपने गॅझेट्स फ्लाइट मोड पे डाल दे’ असे वाक्य तुम्हाला आता विमान प्रवासात ऐकायला मिळाले तर.. हवाई सुंदरींच्या ‘मोबाइल उपकरण बंद किजिए’ अशा हिंग्लिश सूचनांची ही दुरुस्ती अथवा विपर्यास नाही बरे! कारण विमान प्रवाशांना आता त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे ‘फ्लाइट मोड’वर टाकण्याची संधी मिळणार आहे.
विमान प्रवासात आता ‘टेक ऑफ’ व ‘लॅण्डिंग’च्या वेळी मोबाइल, टॅबलेट, फॅबलेट बंद करण्याची गरज राहिलेली नाही. हवाई प्रवास करणाऱ्यांना अशी उपकरणे ‘फ्लाइट मोड’वर टाकण्यास सांगण्यात यावे, अशा सूचना नागरी हवाई महासंचालनालयाने विमान वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. याबाबतच्या नियमांमध्ये तशी दुरुस्तीदेखील करण्यात आली आहे.
भारतीय हवाई सेवेवर नियंत्रण असलेल्या या महासंचलनालयाने मोबाइल ‘स्विच ऑफ’ करण्याऐवजी ते ‘फ्लाइट मोड’वर टाकण्यासाठीचे नियम जारी केले आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान फोन, टॅबलेट हाताळणे तसेच त्यावर खेळ खेळणे अथवा चित्रपट पाहणे शक्य होणार आहे. मात्र त्याचा प्रत्यक्षातील वापर पूर्वीप्रमाणेच विमानतळावर दाखल झाल्यावरच करता येणार आहे.
विमानामध्ये मोबाइल, लॅपटॉप आदी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी करत होते. प्रवासामध्ये प्रलंबित व्यावसायिक कामे करता यावी किंवा करमणुकीची साधने म्हणून ही साधने वापरण्यास परवानगी द्यावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती विचारात घेऊनच डीजीसीएने विमानामध्ये आदी साधने वापरण्यास परवानगी दिली आहे, मात्र ही साधने ‘फ्लाइट मोड’मध्ये वापरता येतील, अशी अटही घातली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रिटिश एअरवेजने विमानामध्ये मोबाइल फ्लाइट मोडमध्ये वापरण्यास परवानगी दिली होती. अमेरिकी एअरवेज आणि काही युरोपीयन एअरवेजनेही अशाच प्रकारचे नियमांमध्ये बदल केले होते.
‘फ्लाइट मोड’ची मुभा!
मोबाइल किंवा लॅपटॉप ‘फ्लाइट मोड’मध्ये असल्यावरही प्रवासी त्याच्यावर काम करू शकतात. व्हिडीओ गेम खेळणे, डाऊनलोड केलेले चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे, डाऊनलोड केलेली पुस्तके वाचणे आदी कामे करू शकतात. मात्र मोबाइलवर संवाद साधणे, एसएमएस किंवा ई-मेल आदी पाठविणे, इंटरनेट यांचा वापर प्रवासी करू शकणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dgca allows in flight use of mobile phones tablets on flight mode
First published on: 24-04-2014 at 02:46 IST