मुंबई : देशाच्या आयात-निर्यात अर्थात परराष्ट्र व्यापाराचा तोल ढळल्याचे प्रमुख सूचक असणारी चालू खात्यावरील तुटीची आकडेवारी रिझव्‍‌र्ह बँकेने गुरुवारी जाहीर केली. अपेक्षेप्रमाणे आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत हे तुटीचे खिंडार आणखी विस्तारून, सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीच्या २.८ टक्के म्हणजेच २३.९ अब्ज अमेरिकी डॉलरच्या चिंताजनक पातळीपर्यंत विस्तारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधीच्या जानेवारी ते मार्च २०२२ या तिमाहीत चालू खात्यावरील तूट ही जीडीपीच्या तुलनेत १.५ टक्के म्हणजे १३.४ अमेरिकी डॉलर इतकी होती. तर गतवर्षी म्हणजे एप्रिल ते जून २०२१ या तिमाहीत भारताच्या चालू खात्यावर ६.६ अब्ज डॉलरचा (जीडीपीच्या तुलनेत ०.९ टक्क्यांचा) अधिशेष होता. म्हणजे वर्षभरात अधिक्य तुटीत बदलले आणि मागील तिमाहीभराच्या कालावधीत तुटीतही जवळपास दुपटीने वाढ झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे पहिल्या तिमाहीमध्ये विशेषत: आयात होणाऱ्या प्रमुख जिनसांच्या किमतीत झपाटय़ाने वाढ झाल्यामुळे निर्यात आणि आयात यांच्यातील दरी लक्षणीय वाढली आहे. मागील १२ महिन्यांत तर परराष्ट्र व्यापाराच्या तोलाच्या आघाडीवर तर खूपच मोठा बदल झाला आहे, हे मागील वर्षांपासून तिमाहीगणिक आकडेवारीतील विपरीत बदलांमधूनही दिसून येते. मागील सहा महिन्यांत, विशेषत: खनिज तेल, खाद्य तेल, सोने, धातू, खते, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वाढलेल्या आयातीने साधलेला हा परिणाम आहे. जून तिमाहीत तेलाची आयातीत ३१ अब्ज डॉलरवरून, ५९ अब्ज डॉलर अशी आणि बिगर तेल आयातही ३५ अब्ज डॉलरने वाढली आहे. तथापि बिगर-तेल आयातीतील वाढ देशांतर्गत ग्राहकांकडून वाढलेल्या मागणीचे आणि अर्थव्यवस्थेतील पुनरुज्जीवन दर्शविते.

वार्षिक १२० अब्ज डॉलरच्या उच्चांकाचे कयास

पहिल्या तिमाहीतील जवळपास दुपटीने वाढ पाहता, विद्यमान २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षांत चालू खात्यावरील तूट ही १२० अब्ज डॉलरचा सार्वकालिक उच्चांक गाठेल, असा ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेचा कयास आहे. मागील वर्षी नोंदविल्या गेलेल्या ३८.७ अब्ज डॉलरच्या तुलनेत जवळपास तिप्पट आणि जीडीपीच्या तुलनेत हे प्रमाण ३.५ टक्के इतके असेल. जरी तुटीचे हे प्रमाण आर्थिक वर्ष २०१२-१३ मध्ये नोंदविल्या गेलेल्या जीडीपीच्या तुलनेत ४.८ टक्क्यांपेक्षा कमीच असले, तरी प्रत्यक्ष रूपात यंदा तिने विक्रमी पातळी गाठणे अपरिहार्य मानले जात आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubling current account deficit gdp in the quarter ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST