पूनम सकपाळ, लोकसत्ता

नवी मुंबई :  युक्रेन-रशिया संघर्षांचा थेट परिणाम आयातीवर होत आहे. सोन्याच्या किमती वाढल्या आहेत, त्याच बरोबर आता खाद्य तेलाचे दरही कडाडले आहेत. खाद्यतेलाच्या प्रतिकिलो दरात २५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होत आहे.     

भारतात  वर्षांकाठी १ कोटी टन खाद्य तेलाची गरज भासते. त्यापैकी २५ लाख टन सूर्यफूल तेल तर ६०-७० लाख टन पाम तेल आयात होते. यापैकी  ७५ टक्के सूर्यफुल तेल हे युक्रेन तर २०टक्के रशिया आणि ५ टक्के अर्जेटिना येथून आयात होते. 

पाम तेल हे मलेशिया आणि इंडोनेशिया येथून आयात होते. देशाला लागणारे सूर्यफूल तेल हे युक्रेन आणि रशियामधून मोठय़ा प्रमाणात आयात होत असते. मात्र आताच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे त्या ठिकाणाहून तेलाची आयात बंद आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. मागील एक वर्षांत खाद्य तेलाच्या दराचा भडका झाला होता. पंरतु पुन्हा दिवाळीनंतर तेलाच्या किमतीत घसरण होऊन दर स्थिरावले होते. मात्र आता रशिया आणि युक्रेनच्या संघर्षांने तेलाच्या दरात पुन्हा अधिक वाढ झाली आहे. 

दोन महिन्यांचा साठा 

येथील एपीएमसी बाजारात सध्या दोन महिने पुरेल इतका तेल साठा उपलब्ध आहे.  युद्धजन्य स्थितीमुळे आयात बंद असून त्याचा थेट दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे येत्या कालावधीत खाद्य तेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे खाद्य तेलाच्या दरात २५ टक्के  वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची सर्वाधिक आयात होत असते. मात्र आता आयात बंद असून बाजारात दोन महिने पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. ही युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर पुढील कालावधीत आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे.  – तरुण जैन, घाऊक तेल व्यापारी, एपीएमसी