सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी लॉकडाउन लागू केला होता. भारतातही लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही थांबलं होतं. परंतु आता देशात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादरम्यान, आता आर्थिक बाबी हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. सलग सहा महिन्यांच्या घसरणीनंतर देशातील निर्यातीत वार्षिक आधारावर ५.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी गुरूवारी याबाबत माहिती दिली. देशातील निर्यात सप्टेंबर महिन्यात वार्षिक आधारावर ५.२७ टक्क्यांनी वाढून २७.४ अब्ज डॉलर्स झाली आहे. हे भारतीय अर्थव्यवस्थेचे जलद गतीनं पूर्वपदावर येण्याचे संकेत आहे. निर्यात ही करोना महामारीच्या पूर्वीच्या स्तरावर पोहोचली असल्याचं गोयल म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड : भारतातील निर्यात सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या या महिन्याच्या तुलनेत ५.२७ टक्क्यांनी वाढली आहे,” असं गोयल म्हणाले. त्यांनी ट्वीट करून यसांदर्भात माहिती दिली. सप्टेंबर २०१९ मध्ये भारताची निर्यात २६.०२ अब्ज डॉलर्स इतकी होती. परंतु करोनाच्या महासाथीमुळे जागतिक स्तरावरही मागणीत घट झाली होती. मार्च महिन्यापासूनच निर्यातीत मोठी घट पाहायला मिळाली होती. पेट्रोलियम, अभियांत्रिकी सामान, चामड्याच्या वस्तू, रत्न आणि दागिन्यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

“देशातील निर्यात आता पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारही आता खुला होत आहे आणि खरेदीदारांनी ऑर्डर देणं सुरू केलं आहे. अन्न व कृषी क्षेत्राची निर्यात पूर्वीप्रमाणेच सुरू राहील कारण त्यांनी करोनाच्या काळातही चांगली कामगिरी बजावली होती,” अशी माहिती टीपीसीआयचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली.

जगातील चीनविरोधाचा फायदा

“ही निर्यातवाढ आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. अनेक देशांमध्ये असलेल्या चीनविरोधी भावनेमुळे अनेर ऑर्डर मिळाल्या आहे. जर भारतानं वस्तू निर्यात योजना (एमईआयएस), जोखीम निर्यात आणि आरओडीटीईपी (निर्यात उत्पादनांवरील शुल्क अथवा करात सूट) यावर काही मार्ग काढले गेले यात अधिक चांगली वाढ होऊ शकते,” असं मत निर्यातदारांची सर्वोच्च संस्था फियोचे अध्यक्ष शरद कुमार सराफ यांनी व्यक्त केलं.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exports snap six month losing streak rise 5 27 pc in september anti china stand world jud
First published on: 02-10-2020 at 09:15 IST