अमेरिकेतील किराणा व्यवसायातील बलाढ्य कंपनी वॉलमार्टच्या फ्लिपकार्ट या भारतीय ई-व्यापार कंपनीच्या १६ अब्ज डॉलरच्या अधिग्रहणाला प्राप्तिकर नोटिशीचे ग्रहण लागले आहे. प्राप्तिकर विभागाने कलम १९७ अन्वये वॉलमार्टला नोटीस बजावली आहे.
बुधवारी भारतीय स्पर्धा आयोगाने वॉलमार्ट-फ्लिफकार्ट व्यवहाराला मंजुरी दिली, पण त्याच वेळी प्राप्तिकर विभागाने कलम १९७ अन्वये वॉलमार्टला नोटीस बजावून, त्यावर १५ दिवसांत उत्तर देण्यास बजावले आहे. या कलमानुसार, भागभांडवलाची विक्री करणाऱ्या अनिवासी भारतीयांना त्यांना कर सवलत अथवा कर माफी का दिली जावी याचे समर्पक कारण द्यावे लागते. कर प्रशासनाला या व्यवहारातून मोठ्या रकमेच्या विथहोल्डिंग कराच्या वसुलीची अपेक्षा आहे. वॉलमार्टने सर्व करविषयक दायित्व पूर्ण करण्याची यापूर्वीच सरकारला हमी दिली आहे. मात्र ९ मे रोजी घोषित हा व्यवहार परवाने-मंजुऱ्यांचे सोपस्कार पूर्ण करून, स्पर्धा आयोगाच्या अंतिम शिक्कामोर्तबानंतर ताबडतोब मार्गी लागेल अशी वॉलमार्टला आशा होती.