मुंबई : एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि करूर वैश्य बँक अशा वेगवेगळय़ा चार बँकांकडून सोमवारी त्यांच्या कर्जावरील व्याजाचे दर वाढविले.  एमसीएलआर आणि रेपो दरासारख्या बाह्य मानदंडावर आधारित (ईबीएलआर) या बँकांची कर्जे महागणार आहेत. त्यामुळे नवीन तसेच विद्यमान अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना याचा फटका बसणार आहे.

देशातील सर्वात मोठय़ा खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने निधीवर आधारित कर्ज दर (एमसीएलआर) ०.२५ टक्क्यांनी वाढवून ७.७० टक्क्यांपर्यंत नेले आहेत. बँकेची ही व्याज दरातील वाढ ७ मे २०२२ पासून लागू केली असून, ती बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा ग्राहक कर्जदारांवरील हप्त्याचा भार वाढणार आहे.

तर सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने रेपो संलग्न व्याजदरात वाढ करून ७.३० टक्क्यांवर, तर एमसीएलआर संलग्न व्याजदर ७.३५ टक्क्यांवर (एक वर्ष मुदतीच्या कर्जाचे) नेले आहेत. या बँकेचे सुधारीत दरही ७ मे २०२२ पासून लागू झाले आहेत. पुण्यात मुख्यालय असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने सर्व प्रकारच्या मुदतीसाठी एमसीएलआर आधारीत व्याज दर ०.१५ टक्क्यांनी वाढविले आहेत. त्यामुळे त्यांची किमानतम पातळी सध्याच्या ७.२५ टक्क्यांवरून, ७.४० टक्के अशी वाढली आहे. तर बँकेचे रेपोसंलग्न व्याज दर ८.८० टक्क्यांवरून, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या रेपो दर वाढीइतकेच म्हणजे ४० आधार िबदूंनी वाढून ७.२० टक्क्यांवर गेले आहेत. ही दर वाढ ७ मे २०२२ पासून लागू झाली आहे.

खासगी क्षेत्रातील करूर वैश्य बँकेने रेपो संलग्न व्याजदर ७.१५ टक्क्यांवरून ७.४५ टक्के नेले असून, ९ मे २०२२ पासून ही दरवाढ लागू केली आहे. चिंताजनक रूप धारण करीत असलेल्या महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने मागील आठवडय़ात रेपो दरात वाढ केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा या सरकारी बँकेने रेपो संलग्न व्याजदरात ०.४० टक्क्यांची वाढ लागू केली आहे.