मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडने वित्तीय सेवा क्षेत्रात महत्त्वाकांक्षी पाऊल टाकताना, गोदरेज कॅपिटल लिमिटेड या बँकेतर वित्तीय सेवा व्यवसायाच्या कार्यान्वयनाची सोमवारी घोषणा केली. नवीन प्रकारच्या व्यवसायाद्वारे ग्राहकांमध्ये वैविध्य आणण्यासोबतच, समूहाने चालू वर्षांत नव्या कंपनीचे सहा नवीन शहरांमधून कामकाजाच्या विस्ताराचे लक्ष्य राखले आहे. गोदरेज इंडस्ट्रीजची उपकंपनी असणारी गोदरेज कॅपिटल ही  गोदरेज हाऊसिंग फायनान्स आणि गोदरेज फायनान्स लिमिटेड या नजीकच्या काळात तयार केल्या जाणाऱ्या अनुक्रमे गृह वित्त आणि बँकेतर वित्तीय कंपनीची होिल्डग कंपनी असेल. गोदरेज कॅपिटलमध्ये १,५०० कोटींच्या भांडवली गुंतवणुकीची ग्वाही गोदरेज इंडस्ट्रीजने दिली आहे.  २०२६ पर्यंत या व्यवसायासाठी एकूण ५,००० कोटींची भांडवली गुंतवणूक आवश्यक ठरेल.