दसऱ्यानंतर सोनेखरेदीसाठी सर्वात चांगला मुहूर्त असणाऱ्या सोमवारच्या अक्षय्यतृतीयेला नरमलेल्या भावाचा योग जुळून आल्याने सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण होते. व्यापाऱ्यांचा बंद-निदर्शने आणि वाढत चाललेली मौल्यवान धातूंची निर्यात याचा मागमूसही अनेक दालनांमध्ये दिसला नाही. उलट तोळ्यासाठी २७ हजारांभोवती असणाऱ्या सुवर्णदरामुळे गुंतवणूकदारांसह हौशी खरेदीदारांकडून सोने लुटले गेले.
गेल्या महिन्यातील गुडीपाडव्याप्रमाणेच देशातील सोने-चांदी खरेदी-विक्रीच्या व्यासपीठावरील वातावरण यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाहायला मिळाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आणि दसऱ्यानंतर सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जाणाऱ्या या दिवशी सोन्याचे कमी पातळीवर आलेले दरही कारणीभूत ठरले. १३-१३ अर्थात १३ मे २०१३ असा अनोखा आकडाही गाठण्याच्या दृष्टीने अनेकांची पावले मुद्दाम सराफ्यांकडे वळली होती.
स्थानिक संस्था करविरोधातील व्यापाऱ्यांच्या बंदमुळे मुंबई सराफा संघटनेच्या अधिकृत पटलावरून गेले दोन दिवस सोने-चांदीचे दर जाहीर होत नव्हते. परिणामी, शहरातील अनेक दालनांमध्ये गेल्या आठवडय़ातील शुक्रवारच्या दरानुरूपच भाव झळकवले जात होते. तोळ्यासाठी सोन्याचा भाव २७ हजार रुपयांच्या नजीक असल्याने तमाम गुंतवणूकदारांकडून विविध ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्यांसाठी पसंती मिळत होती. तर लग्नाचा मोसम असल्याने कमी झालेल्या दरांची जोड अनेक खरेदीदारांनी मिळविली.
राजधानी दिल्लीतही सोने तोळ्यामागे गेल्या आठवडय़ातील २७,६५० रुपयांपासून सोमवारी २७,५२० रुपयांपर्यंत घसरले आहेत, तर चांदीचे दरही आठवडय़ापूर्वीच्या ४६,२०० रुपयांच्या तुलनेत आजच्या ४५,५०० रुपयांपर्यंत नरम झाले आहेत. मुंबईत सराफ संघटनेने तोळ्याचा दर दिवसअखेर २६,९८५ रुपये, तर चांदीचा भाव ४५,९१५ रुपयांवर स्थिर केला. अनेक किरकोळ दालनात मौल्यवान धातूचा विक्रीचा दर यापेक्षा ३०० ते ५०० रुपये अधिक मात्रेने झळकत होता. शुक्रवारच्या तुलनेत सोने-चांदीचे दर सोमवारी कमी झालेले पाहायला मिळाले.
अक्षय्यतृतीयेसारखा महत्त्वाचा मुहूर्ताचा दिवस असूनही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळत आहे. एमसीएक्स आणि एनएसईएलसारख्या बाजारांतही धातूंचे दर एक टक्क्याने ओसरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे व्यवहारही कमी आहेत.
* सी. पी. कृष्णन,
पूर्णवेळ संचालक, जिओजित कॉमट्रेड.
मौल्यवान धातूंचे सध्या कमी होत असलेले दर हे ऐन मुहूर्ताच्या वेळी सराफा वर्तुळात उत्साह वाढविणारे आहेत. यामुळे केवळ दसरा-दिवाळीच्या वेळीच मागणी असते, हा दावा फोल ठरला आहे. दागिन्यांबरोबरच नाण्यांसाठीही खरेदीदारांची विचारणा लक्षात घेण्यासारखी आहे.
* समीर सागर,
संचालक, मनुभाई ज्वेलर्स.
यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या खरेदीच्या वेळी सोने तसेच चांदीतील कमी होत असलेले दर पाहून खरेदीदारांकडून अधिक प्रतिसाद मिळेल, अशी आशा होतीच. किमान पातळीवरच्या या दरांमुळे मौल्यवान धातूंची विक्री वार्षिक तुलनेत यंदा १५ ते १८ टक्के तरी अधिक झाली असेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
* हरेश सोनी,
अध्यक्ष, अखिल भारतीय रत्न व आभूषण संघटना.