• ३०० संघटना; १ कोटी कामगार सामील
  • देशभरात १ लाख दालने बंद राहणार

मोठय़ा रकमेच्या सुवर्ण खरेदीकरिता ‘पॅन’ अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सराफा व्यावसायिकांनी बुधवारी एक दिवसाचा बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. या देशव्यापी बंदमधील सहभागामुळे क्षेत्रातील विविध ३०० संघटनेच्या नेतृत्वाखालील एक लाखांहून सराफ पेढय़ा, दालने बंद राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन लाख रुपयांवरील सोने धातू अथवा सोन्याचे दागिने खरेदीकरिता सरकारने आता पॅन अनिवार्य केले आहे. यापूर्वी ही मर्यादा ५ लाख रुपयांपुढे होती. १ जानेवारी २०१६ पासून पॅन सक्तीचे केल्यापासून सराफा व्यवसाय ३० टक्क्यांनी घसरल्याचा दावा आंदोलन पुकारणाऱ्या प्रमुख संघटनेने केला आहे.

‘ऑल इंडिया जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलरी ट्रेड असोसिएशन’ (जीजेएफ)च्या नेतृत्वाखाली या क्षेत्रातील तब्बल ३०० संघटना आंदोलनात सहभागी होत असून यामुळे देशभरातील एक लाखांहून सराफ पेढी, दालने बंद राहणार आहेत. यामुळे या क्षेत्रातील एक कोटींहून अधिक कामगारही आंदोलनात सहभाग असेल. बंदला ‘महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळाचा’ही पाठिंबा असल्याचे संघटनेचे सचिव दिलीप लागू यांनी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

सरकारच्या सक्तीमुळे आधीच मंदीच्या गर्तेत असलेल्या या व्यवसायात बेरोजगारीचे संकटही येऊ घातल्याचे ‘जीजेएफ’चे अध्यक्ष जी. व्ही. श्रीधर यांनी म्हटले आहे. पॅन सक्तीमुळे ते नसणाऱ्या मोठय़ा आकारातील लोकसंख्येमुळे विशेषत: निमशहरे, लहान गावे येथील सराफांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचेही ते म्हणाले.

तर संघटनेचे संचालक अशोक मिनावाला यांनी सरकारच्या उपाययोजना या लाखो सराफा व्यावसायिकांच्या आणि सुवर्णकार, कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या असल्याचे म्हटले आहे. भारतात आतापर्यंत   केवळ २२.३ लाख पॅन दिले गेले असताना ही सक्ती कितपत सार्थ आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या महिन्यापासून पॅनसक्ती लागू झाल्यानंतर सराफांनी देशभरातील ६० शहरांमधून मेणबत्ती मोर्चा काढून सर्वप्रथम विरोध दर्शविला होता.

‘आयबीजेए’चा मात्र ‘बंद’ला विरोध!

‘पॅन’सक्तीविरोधात सुवर्ण व्यापाऱ्यांकडून पुकारण्यात येणाऱ्या बुधवारच्या देशव्यापी बंदला ‘इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशन’ने (आयबीजेए) मात्र विरोध दर्शविला आहे. व्यापाऱ्यांच्या ठरावीक गटाचा एक दिवसाचा बंद म्हणजे सरकारच्या धोरणाविरुद्धची भूमिका असल्याचे नमूद करत संघटनेचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनी आमचा या बंदला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट केले. आंदोलन करण्यापूर्वी संबंधित संघटनेने पुनर्विचार करावा, असे आवाहनही कंबोज यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात केले आहे. सुवर्ण उद्योगासाठी गेल्या अनेक वर्षांनंतर सध्याचे सरकार हिताचे निर्णय घेत असताना त्यांच्या धोरणाला अशा प्रकारे विरोध करणे गैर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold sellers closed today in india
First published on: 10-02-2016 at 10:10 IST