आजच्या घडीला बहुतांश बँकांच्या नफाक्षमतेला तरतुदीपोटी वाढीव रकमेची तरतूद करावी लागल्याने खिंडार पडले असताना, केवळ व्याजापोटी उत्पन्नातच नव्हे तर, शुल्काधारित उत्पन्न तसेच परिचालनात्मक महसुलात निरंतर वाढ दाखवून, सद्य बँकिंग प्रवाहात आपल्या वेगळेपणाचा ठसा सार्वजनिक क्षेत्रातील सिंडिकेट बँकेने स्पष्टपणे उमटविला आहे. सिंडिकेट बँकेने ३१ मार्च रोजी संपलेल्या २०१२-१३ आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत ५९२.३४ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे, जो आधीच्या वर्षांतील याच तिमाहीतील नफ्याच्या तुलनेत तब्बल ९१.४ टक्क्यांनी अधिक आहे. बुडीत कर्जे अर्थात एनपीएपोटी करावी लागणारी तरतूद कमी असल्याने बँकेला उत्तम नफा नोंदविता आला आहे. बँकेने या तिमाहीत रु. ४७८०.७५ कोटींचे एकूण उत्पन्न कमावले जे आधीच्या तुलनेत आठ टक्क्यांनी वधारले आहे. बँकेने आक्रमकपणे शाखाविस्ताराची मोहीम हाती घेतली आहे, येत्या ३१ मेपर्यंत ३००० शाखा, तर सप्टेंबर २०१३ पर्यंत शाखांची संख्या ३२०० वर नेली जाईल, असे सिंडिकेट बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. जी. संघवी यांनी सांगितले. मार्चअखेर बँकेच्या देशभरात २९३४ तर विदेशात लंडनमध्ये १ शाखा कार्यरत आहे. प्रति समभाग ६.७० रुपयांच्या लाभांशाचीही बँकेने घोषणा केली आहे.