सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद प्रथमच वेगवेगळे करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील चार आघाडीच्या सार्वजनिक बँकांच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरील व्यक्तींची नावे जाहीर करत केंद्र सरकारने हा प्रयोग अमलात आणला आहे. काही बँकांवरील गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अध्यक्षपदाची नावे मात्र अद्याप जारी करण्यात आलेली नाहीत.
भारतातील खासगी क्षेत्रात सध्या बँकांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपद भिन्न आहे. तर व्यवस्थापकीय संचालकांबरोबरच मुख्य कार्यकारी अधिकारी पदही जोडले गेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेतही हीच पद्धत आहे. या क्षेत्रात केवळ स्टेट बँकेत अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक स्वतंत्र आहे. त्यातही अरुंधती भट्टाचार्य यांच्या रूपाने बँकेला प्रथमच महिला अध्यक्ष मिळाली आहे. तर अन्य काही व्यवस्थापकीय संचालक आहेत.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद भिन्न ठेवण्याची शिफारस रिझव्र्ह बँकेने नियुक्त केलेल्या ए. एस. गांगुली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने २००४-०५ दरम्यान केली होती. त्याची अंमलबजावणी खासगी बँक क्षेत्रात २००७ मध्येच झाली.

नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी
* युनायटेड बँक ऑफ इंडिया    
पी. श्रीनिवास (कार्यकारी संचालक, बँक ऑफ बडोदा)
* ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स    अनिमेश चौहान (कार्यकारी संचालक, बँक ऑफ इंडिया)
* इंडियन ओव्हरसीज बँक    आर. कोटीस्वरन (कार्यकारी संचालक, बँक ऑफ इंडिया)
* विजया बँक        किशोर कुमार सान्सी (कार्यकारी संचालक, पंजाब आणि सिंध बँक)
* (कंसात आधीची जबाबदारी व बँक)