गेल्या काही सत्रांमध्ये ग्रीसची चिंता वाहणारा भारतीय भांडवली बाजार बुधवारी चीनी अर्थव्यवस्थेवर मोठय़ा प्रमाणात नाराज झालेला दिसला. प्रमुख चीनी निर्देशांकांमध्ये बुधवारी मोठी आपटी नोंदविली जाताच सेन्सेक्ससह निफ्टीनेही आठवडय़ाच्या तिसऱ्या व्यवहारात अस्वस्थता पसरवली.
एकाच व्यवहारात जवळपास ५०० अंश आपटी नोंदवित सेन्सेक्स २८ हजाराच्याही खाली आला. तर जवळपास दीडशे अंश घसरणीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,४०० खाली उतरला.
भारतीय प्रमुख भांडवली बाजाराची ही महिन्याभरातील सर्वात मोठी आपटी होती.
युरो झोनमध्ये राहण्यावरून ग्रीसबाबतचे चित्र स्पष्ट होत असतानाच शेजारच्या चीनी अर्थव्यवस्थेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
प्रमुख चीनी निर्देशांकांमध्ये ५ टक्क्य़ांपर्यंतच्या आपटीने मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारही बुधवारी अस्वस्थ झाले.
सलग दोन व्यवहारातील तेजीनंतर बाजारात मंगळवारी किरकोळ घसरण नोंदली गेली. अस्वस्थ चीनी भांडवली बाजारांकडे लक्ष ठेवत येथील सेन्सेक्सने सकाळच्या सत्रातच २८ हजाराचा स्तर सोडला.
यावेळी मुंबई निर्देशांक जवळपास ३०० अंशांनी खाली आला. सत्रात त्याचा किमान स्तर २७,६३५.७२ राहिला.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीनेही व्यवहाराच्या सुरुवातीलाच ८,४०० चा टप्पा सोडला. सेन्सेक्सने यापूर्वी २ जून रोजी ६६१ अंश अशी एकाच सत्रातील मोठी आपटी नोंदविली आहे. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये पावणे दोन टक्क्य़ांची घसरण झाली.
पोलाद, वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठे नुकसान सोसले. सर्व क्षेत्रीय निर्देशांक ४ टक्क्य़ांपर्यंत आपटले होते.
मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्येही १.२५ टक्क्य़ांहून अधिक आपटी नोंदली गेली. सेन्सेक्समध्ये केवळ हिंदुस्थान यूनिलिव्हर तेवढा तेजीत राहिला. सेन्सेक्समध्ये वेदांता सर्वाधिक, ७.८५ टक्क्य़ांनी घसरला. क्षेत्रीय निर्देशांकांत पोलाद निर्देशांकाला सर्वाधिक फटका बसला.
्रगुंतवणूकदारांच्या एक लाख कोटी रुपयांवर पाणी
चीनी बाजारपेठांवर आपली चाल चालणाऱ्या मुंबई शेअर बाजारात गुंतवणूकदारांना बुधवारी एक लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. एकाच सत्रात जवळपास ५०० अंश अंश आपटी नोंदविणाऱ्या व २८ हजाराखाली येणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचे भांडवल बुधवारी १,३३,३७२ कोटी रुपयांनी कमी होत १,०२,५५,८२९ कोटी रुपयांवर येऊन ठेपले.